Aaditya Thackeray : "राजकारण संपवून शाश्वत विकासावर काम करण्याची गरज आहे. सरकार कोणतंही राहिलं तरीही लोकांच्या हिताचा विचार करायला हवा, खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील," असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  त्यांनी केला आहे. ते पुण्यातील  पत्रकार परिषदेत बोलत होते. आपले मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात जाऊन गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. ते फक्त गणपती मंडळ आणि दहीहंडीत फिरण्यात व्यस्त आहेत, अशीही टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.


महाविकास आघाडीचं सरकार असताना पहिल्यांंना 80 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार केला होता. तेव्हा देखील केंद्रात त्यांचं सरकार होतं आणि महाराष्ट्रात मविआचं सरकार होतं. तरीही दोन्ही कामं सुरळीत सुरु होती. मात्र खोके सरकार आल्यावर महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात का जात आहेत?, महाराष्ट्राच्या वाटेला नेहमी अपयश का येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कृषी मंत्री कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहिती नाही कारण अजूनही बांधावर कोणीही दौरा केला नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री कोण आहेत हे माहित नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का?


महाराष्ट्रातील चार प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांचं मोठं नुकसान झालं आहे. उदय सामंतानी एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगितलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली?, याचा अर्थ राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? एखादा करार जर कोणत्या राज्यासोबत झाला तर तो प्रकल्प दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊ शकत नाही. हे आपल्याला माहित आहे तरीही महाराष्ट्रात एअरबस हा प्रकल्प आणू असं सांगत होते, असाही आरोप त्यांनी मंत्री उदय सामंतांवर केला आहे. या खोके सरकारवर अनेक उद्योजकांचा विश्वास नाही त्यामुळे चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.


पुण्यात शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे


पुण्यात काही तासांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सगळ्यांच्या एकत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. मेट्रो, बिल्डर, महापालिकेने एकत्र येत यावर उपाय काढला पाहिजे. त्यानुसार नियोजन करायला पाहिजे. मुंबईतील हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलं नाही त्या पद्धतीची उपाययोजना पुण्यात करायला हवी, असंही ते म्हणाले.