औरंगाबाद : पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी 'आदित्य संवाद' हा महाराष्ट्रातील युवा वर्गाला जोडणारा एक नावीन्यपूर्ण असा संवादात्मक उप्रकम केला होता. शिवसेना सत्तेत आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आता 'डेव्हलपमेंट डायलॉग' (Development Dialogue) नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे .
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी आदित्य संवाद नावाचा कार्यक्रम घेऊन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागांतील युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात शहराच्या विकासाविषयी, तसेच विकासकामांविषयीच्या युवकांच्या मनातील त्यांच्या संकल्पना आदित्य ठाकरे यांनी जाणून घेणार आहेत. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
'आदित्य संवाद' या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष संवाद आणि भेटीगाठींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक वर्गाच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्या होत्या. युवा वर्गाशी निगडीत सामाजिक चर्चांना योग्य तो आकार देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आदित्य ठाकरे यांच्या या कार्यक्रमाचा उद्देश होता. विधानसभा निवडणुकीनंतर आणि शिवसेना सत्तेत आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याच धाटणीचा डेव्हलपमेंट डायलॉग नावाचा कार्यक्रम घेत आहेत. आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील रामा हॉटेलमध्ये शहरातील मान्यवर व्यक्तींना एकत्र करून, त्यांच्या शहराच्या विकासा विषयीच्या संकल्पना जाणून घेतल्या. क्रीडा, साहित्य, इतिहास, उद्योग, पर्यटन, शिक्षण यांसह अन्य विषयांचे अभ्यासक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आदित्य ठाकरे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरा विषयीच्या विकासाच्या संकल्पना, शहर प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सरकार म्हणून काय प्रयत्न करणं गरजेचं आहे, याविषयीची मतं जाणून घेतली या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरू यांच्यासह मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदिपान घुमरे यांच्यासह अन्य नेतेमंडळी देखील उपस्थित होती. मान्यवरांनी मांडलेल्या सूचना आदित्य ठाकरे यांनी आपल्या वहीमध्ये नोंद करून घेतल्या आहेत. दोन महिन्यानंतर अशाच प्रकारे भेटण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. आदित्य संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना जोडल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींच्या सोबत शहराच्या विकासाविषयी साधलेल्या संवादातून शिवसेनेची नवी छबी नागरिकांच्या मनात उभी करण्याचा हा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे.