Aaditya Thackeray : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवर विधीमंडळात जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. ही श्वेतपत्रिका नव्हे तर खोके सरकारच्या नाकर्तेपणाचा ढळढळीत पुरावा असल्याचा टोला ठाकरेंनी लागवलाय. खोके सरकारच्या नाकर्तेपणाची आणि उद्योगजगताचा सध्याच्या सरकारवर अजिबात विश्वास नसण्याची साक्ष देणारी 'श्वेतपत्रिका' प्रकाशित झाल्याचे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राबाहेर गेलेले चार मेगा प्रकल्प हा ह्या श्वेतपत्रिकेचा विषय आहे.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे उद्योग आणि प्रकल्प MIDC सोबत महाराष्ट्रात येण्यासाठी अंतिम टप्प्यावरची चर्चा करत होते, तेच प्रकल्प बेकायदेशीर खोके सरकार येताच ते प्रकल्प बाहेर गेल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. श्वेतपत्रिकेत बहुतेक तारखा आणि तथ्य नमूद करताना, काही खणखणीत सत्य समोर आणत आहे. मिंधे-भाजपचा महाराष्ट्राविषयी द्वेष आहे. खोके सरकार स्थापन झाल्यावर उद्योग कसे दुसऱ्या राज्यात पाठवले याचा पुरावा श्वेतपत्रिकेत असल्याचे ठाकरे म्हणाले. गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळं सद्याच्या परिस्थितीत उद्योग जगताचा अजिबात विश्वास उरलेला नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.


राज्यात पूर्णपणे अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री : आदित्य ठाकरे


राज्यात दुर्दैवाने एक पूर्णपणे अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी उद्योजकांच्या भेटीनंतर स्वहस्ते उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. श्वेतपत्रिकेत वेदांता- फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन उद्योगांचा उल्लेख आहे. मात्र, महाराष्ट्रापासून दूर ढकललेल्या इतर उद्योगांचा यामध्ये उल्लेख करण्यात आला नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
1) वैद्यकीय उपकरण पार्क (Medical Device Park) 2) सौर ऊर्जा उपकरणे पार्क (Solar Energy Equipment Park) तसेच बल्क ड्रग पार्क बद्दलच्या उल्लेखावरून तर हे सिद्ध होते की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र हा सर्वतोपरी सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सर्वच्या सर्व तीन पार्क नाही, तर किमान एक पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते असे ठाकरे म्हणाले. हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता, की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा प्रश्न मला पडत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्रातल्या सरकारमधले हे एक इंजिन तर पूर्णपणे फेल


धोकेबाजीने सत्तेत आलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारमधले हे एक इंजिन तर पूर्णपणे फेल गेले असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तसेच, खोके सरकारने सांगितल्याप्रमाणं 'वेदांता फॉक्सकॉन' प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, त्या प्रकल्पाचा ह्या श्वेतपत्रिकेत उल्लेखही नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यात वेदांत फॉक्सकॉनच्या "फॉरवर्ड इंटिग्रेशन" प्रकल्पाचाही साधा उल्लेख करण्यात आलेला नाही. ज्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते. तो प्रकल्प अजूनही सुरू आहे का? असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Uday Samant : वेदांता फॉक्सकॉनबाबत आठ दिवसात श्वेतपत्रिका काढणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा