रत्नागिरी : आजपर्यंत तुम्ही अनेक महागड्या घरांची चर्चा ऐकली असेल. लाखो-करोडो रुपयांच्या अलिशान घरांची चर्चा होणे सामान्य गोष्ट आहे. पण रत्नागिरीतील चिपळूणमध्ये सध्या एका शौचालयाची चर्चा सुरु आहे. शौचालय चर्चेत का आहे? तर या शौचालयावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत, यामुळे हे शौचालय चर्चेत आहे. 


सरकारने हगणदारीमुक्त परिसर म्हणून परिपत्रक जाहीर केले आणि मग चिपळूणात शौचालय बांधणीचा नवीन फंडा सुरु झाला. शहरात सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी येथील नगर परिषदेने तब्बल 73 लाख रुपये इतका खर्च केल्याचे आता समोर आहे. त्यापैकी चिपळूण पाग बौद्धवाडी येथील शौचालयासाठी पाच नाही दहा नाही तर तब्बल 27 लाख 24 हजार 600 रुपयांचा खर्च केल्याचं दाखवण्यात आलं आहे. 


10 बाय 15 च्या दोन खोल्यांमध्ये पुरुष व महिला यांच्यासाठी प्रत्येकी 4 -4 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठी जास्त रक्कम खर्च करण्यात आली असल्याचं येथील नगरसेवक म्हणतात. एवढ्या मोठ्या रकमेत मोठा आणि प्रशस्त बंगला होऊ शकतो. इतकेच नव्हे तर शौचालये बांधण्यासाठी 58/2 या नियमवालीचा वापर करून परिषदेत ठरावही मंजूर करण्यात आला.


मात्र या शौचालयाच्या खर्चाचा मुद्दा भाजप नगरसेवक खोडून काढत आहेत. त्याठिकाणी कोरोनाच्या काळात शौचालय अत्यावश्यक असल्यामुळे ते तात्काळ बांधण्यात आले आहे, असं नगराध्यक्षांच्या वतीने भाजप नगरसेवक सांगत आहेत. याविषयी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी मात्र मौन बाळगलं आहे. त्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. 


शहरात 10 लाखांपासून ते चक्क 28 लाखांपर्यंत सार्वजनिक शौचालयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. असे एकूण 73 लाखांचे अंदाजपत्रक तयार करून कामेही सुरु करण्यात आली. त्यापैकी काही ठिकाणी जुने पाडून नवीन शौचालय बांधण्याचा हट्ट करण्यात आला आहे, असा आरोप अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी केला आहे.


राजकीय वादात अशा प्रकारच्या शौचालयावर लाखोंचा खर्च केला जातोय. पैसा मात्र जनतेचा खर्च होतोय. मग यावर शासकीय अधिकारी कोणती भूमिका घेणार. यावर चिपळूणवासियांचे लक्ष आहे. जनतेच्या करातून जमा केलेला पैसा अशा पद्धतीने खर्च केला तर शहराचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.