सांगली : माझं नशीब उलटं सुलटं करण्याची अजून कोणामध्ये हिंमत नाही, माझं नशीब बदलणारा अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही. त्यामुळे काहीतरी कमेंट करून माझं नशीब कुणी बदलू शकत नाही. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मला मिळेल आणि तिसऱ्यांदा मला खासदार होण्याची संधी मिळेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला. 


कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला


सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय काका बोलत होते. आपल्याला जिल्ह्यातील काही नेत्यांनी गुप्तपणे मदत केली हे खरं आहे का? असा प्रश्न संजय काकांना विचारला असता कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला असे म्हणत आपल्याला काही नेत्यांनी मदत केल्याचं एक प्रकारे संजयकाकानी मान्य केलं. यंदाच्या निवडणुकीत लीड कमी राहील पण विजयाची नक्की खात्री असल्याचे सांगितले. 


संजय काकांनी आमदार विश्वजित कदम यांच्या मी कुठल्या पाटलांच्या मागे उभा आहे हे 4 जूनला कळेल या विधानावर प्रतिक्रिया देत माझे नशीब उलट सुलट करण्याची अजून कोणाच्यात हिंमत नाही, असे म्हणत विश्वजीत कदम यांना एकप्रकारे संजयकाका पाटील यांनी आव्हान दिले. 


सहानभूतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते, पण फक्त सहानभूतीवर लोक मतदान करत नाहीत असे म्हणत संजय काकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाही टोला लगावला. महायुतीमध्ये राहून अनेक ठिकाणी आपल्या विरोधात काही जणांनी काम केल्याचे देखील संजयकाकांनी सांगितले. 


तिन्ही सिंचन योजनांसाठी पाण्याची कमतरता भासू देणार नाही


ते म्हणाले की, या निवडणुकीत रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना रंग दाखवायची वेळ आली. ज्या महायुतीच्या नेत्यांनी विरोधात काम केले त्याची व्याजासकट परतफेड होईल असे म्हणत संजय काकांनी एक प्रकारे आपल्या विरोधात काम केलेल्यांना इशारा दिला. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या जिल्ह्यातील तिन्ही सिंचन योजनांसाठी पाण्याची कमतरता भासू देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलं आहे, अशी माहिती  संजय काका पाटील यांनी दिली. एकूण 12 टीमएमसी पाण्याची मागणी केली होती, त्यातील 8 टीमएमसी पाणी मंजूर झालं, पण आणखी 4 टीएमसी पाणी मिळावे अशी देखील मागणी आपण केल्याचं संजय काकानी सांगितलं.