Vijay Wadettiwar : आगामी विधानसभेच्या तोंडावर चंद्रपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद वाढत चालल्याने आज थेट दिल्लीत बैठक बोलावण्यात आली. या बैठकीसाठी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला सुद्धा उपस्थित होते. बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. बैठकीनंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज वरिष्ठ नेत्यांसोबत मी भेटी घेतल्या. यावेळी राज्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली. राज्यातील घडामोडींची माहिती दिली. महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. 23 सप्टेंबर रोजी आमच्या चंद्रपूर जिल्ह्याची बैठक आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. चंद्रपुरातील वादावर विचारण्यात आले असता ते म्हणाले की, त्याबाबत काही चर्चा झाली नाही. तो प्रकार गैरसमजातून निर्माण झाला होता त्यावर आम्ही आता पडदा टाकला आहे.
दोघांमध्ये वाद आहे तरी काय?
लोकसभा निवडणुकीपासून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. प्रतिभा धानोरकरांचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्या निवडून आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकरांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी विजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. निवडणुकीपूर्वी प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातील नेत्यांनी त्रास दिल्याने आपल्या पतीचे निधन झाल्याचा आरोप केला होता.
अशी ही बनवाबनवी हा नवा उद्योग राज्य आणि केंद्र सरकार करत आहे
दरम्यान, कांदा निर्यात शुल्क कमी करण्यावरून वडेट्टीवार यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, 2013 मधील पाशा पटेल आणि फडणवीस यांच्या क्लिप काढून बघा. अदाणी समूहाने 1 लाख 38 हजार टन तेल आयात केलं आहे. आता तुम्ही निर्यात दर कमी करण्याचा निर्णय घेता, हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा जुमला आहे. राज्यात कुठे कांदा आहे? तेव्हा असा निर्णय घेतला. अशी ही बनवाबनवी हा नवा उद्योग राज्य आणि केंद्र सरकार करत आहे.
ते पुढे म्हणाले की, हे इजा बिजा तिजा महाराष्ट्राला लुटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात कमीशन खाणारे हे भाजपचे लोक आहेत. 32 कोटी कोणी खाल्ले याचा शोध घेण्याची, चौकशी करण्याची गरज आहे. हे कमीशनखोर, डाकू, लुटारूंचं सरकार आहे. लुटारूंची टोळी या राज्यावर बसली आहे. आमचं सरकार आल्यावर या सगळ्या टेंडरची चौकशी करू. आम्ही या सगळ्या घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढू. लाडक्या बहिणीची चौकशी करण्यासाठी काही नाही. हे मतांसाठी केलं असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या