ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) काही दिवसांतच निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. मुंबईसह (Mumbai) उपनगरातील प्रशासकीय यंत्रणांचा निवडणूक आढावाही मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. राज्य सरकारचे सर्वच कर्मचारी आणि शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचा सहभाग निवडणूक प्रक्रियेत असतो. त्यामुळे, त्या दृष्टीने आता प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कामाला लागल्या आहेत. मात्र, डोंबिवलीतील एका शाळेने निवडणूक (Election) काम करण्यास नकार दिल्यामुळे संबंधित शाळा (School) प्रशासनावर थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने हा गुन्हा दाखल झाला आहे.

  


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही गगराणी यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले. गगराणी यांनी घेतलेल्या बैठकीमुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचं सप्ष्ट झालं आहे. कारण, प्रशासकीय यंत्रणा आता निवडणुकांच्या कामाला लागल्या आहेत. या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे एकीकडे ही बैठक पार पडली असताना दुसरीकडे डोंबिवली एका शाळा प्रशासनाने निवडणूक कामकाजास नकार दिल्यामुळे त्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  


तलाठ्याची फिर्याद, 134 अंतर्गत गुन्हा


आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिल्याने डोंबिवलीतील एमआयडीसीमधील सिस्टर निवेदिता शाळेच्या प्रशासनाविरोधात डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाने कर्मचारी वर्ग देण्यास नकार दिला, या शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याने शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे. महसूल विभागाचे डोंबिवली एमआयडीसी परिसराचे तलाठी लक्ष्मण नाना शिंदे यांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून सिस्टर निवेदिता शाळेविरुद्ध तक्रार केली आहे. त्यानंतर, हा गुन्हा दाखल करण्यात आला. 


हेही वाचा


एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत