नागपूर : अंत्यसंस्कारासाठी सरण पेटवताना आगीची भडका झाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे भाजले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली आहे. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम इथे एका स्थानिक रहिवाशाच्या अपघाती मृत्यू झाला होता. सिद्धार्थ अंतुजी हुमने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते. दरम्यान सरण पेटवत असताना डिझेलचा भडका उडाला. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघं गंभीर जखमी झाले. तिघांनाही भरपूर भाजलेले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादारम्यानच यातील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अशी घडली घटना
पार्थिव सरणावर ठेवून अग्नी दिल्यानंतर सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा जवळच असलेल्या डिझेलच्या डबकीवर पडला आणि त्या डिझेलचा भडका उडाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी तिघे भाजल्यानंतर गंभीर जखमी झाले होते. भाजलेले तिघेगी खलासी लाइन, नागसेननगर येथील रहिवासी आहेत. पार्थिव व्यवस्थित जळावे यासाठी काहीजण सरणावर डिझेल फेकत होते. त्यातच पेटत्या लाकडाचा निखारा उडाला आणि डिझेलच्या डबकीवर पडला. त्यामुळे डबकीतील डिझेलचा भडका उडल्याने डबकीजवळ असलेल्यांनी लगेच पळ काढला. मात्र तिघे गंभीररित्या भाजल्या गेले. इतरांनी लगेच तिघांच्या अंगावरील कपडे विझवले आणि त्यांना कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले.
दोघांना मेयोमध्ये केले दाखल
तिघांवर प्रथमोपचार केल्यानंतर दिलीप गजभिये व सुधाकर खोब्रागडे यांना नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात, तर सुधीर डोंगरे यांना कामठी शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. माहिती मिळताच कामठी (नवीन) पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.