Daund Leopard News : रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा (leopard) मृत्यू झाला आहे. ही घटना दौंड (Daund) तालुक्यातील लडकतवाडी येथे घडली आहे. लडकतवाडी परिसरातील शेतकरी शशिकांत जनार्दन लडकत यांच्या ऊसाच्या शेताच्या बांधावर अज्ञात व्यक्तींनी शिकारीसाठी लोखंडी साखळी जोडलेला पंजा ठोकून सापळा रचला होता.
अज्ञात माणसाने रानडुकराच्या शिकारीसाठी हा सापळा लावल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. या सापळ्यात नर जातीचा 6 वर्षीय बिबट्या अडकून बळी गेल्याची घटना घडली. काल या परिसरातून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी या ठिकाणी बिबट्या मृत अवस्थेत पडल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी मृत अवस्थेत पडलेल्या बिबट्याची आणि परिसराची पाहणी केली. यावेळी अज्ञात व्यक्तींनी शिकार करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पाय अडकण्याचा ट्रॅप लावल्याने आणि त्यामध्ये बिबट्याचा पाय अडकून तडफडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आलं. मृत झालेला बिबट्या हा नर आहे. या बिबट्याचा मृत्यू आठ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल
या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना आरोपींना लवकरच शोध घेतला जाईल, असे वनाधिकारी कल्याणी गोडसे यांनी सांगितले. मृत बिबट्यावर पिंपळगाव येथील वन विभागाच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.
आठ दिवस दुर्लक्ष का?
बिबट्याचा मृत्यू झालेला परिसर हा ओढ्याच्या बाजूला आहे. त्यात सगळीकडे पावसाचे दिवस आहे. या भागात प्रचंड प्रमाणात शांतता असते. त्यामुळे गावकरी या परिसरातून प्रवास करण्याचं टाळतात. मात्र काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने गावकऱ्यांनी या भागातून प्रवास करायला सुरुवात केली होती. त्या दरम्यान गावकऱ्यांना बिबट्या मृतावस्थेत सापडला. हा बिबट्या सहा वर्षांचा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
वन्यजीव रक्षकांकडून निषेध
काही दिवसांपुर्वी दौंड तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. दौंड तालुक्यात बिबटे गावात शिरत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याच्या अशाप्रकारे होत असलेल्या मृत्यूमुळे वनजीव रक्षकांकडून आणि गावकऱ्यांकडून तीव्र निषेध दर्शवला जात आहे. यावर काहीतरी उपाय काढा, अशी मागणी वन्यजीव रक्षकांकडून केली जात आहे.
संबंधित बातम्या-
Mumbai News : गोरेगाव फिल्मसिटीत सात महिन्याचा बिबट्या मृत अवस्थेत; पोलिस वन विभागाचा तपास सुरु