बुलडाणा : राज्यातील विविध ठिकाणचे एटीएम फोडून लाखो रुपये पळवणाऱ्या टोळीला बुलडाण्यात पकडलं आहे. या टोळीने नागपूर शहर, वेलतूर आणि नांदेड इथे एटीएम फोडल्याची कबुली दिली. 56 लाख रुपयांसह या टोळीला पकडण्यात आलं.


नांदेड शहरातील दोन एटीएम फोडून सोळा लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेचे दोन एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी दोन्ही एटीएममधील 16 लाख रुपये लंपास केले.

स्कॉर्पियो गाडीतून चोरटे पसार झाले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर नांदेड पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. शिवाय अन्य जिल्ह्यातील पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली.

लुटलेली रक्कम घेऊन पसार झालेले चोरटे बुलडाणा जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

तीन आरोपींकडे तब्बल 56 लाख रुपये आढळले. 24 आणि 25 जूनच्या रात्री या चोरांनी नागपूर येथे देखील तीन एटीएम फोडल्याची माहिती पोलिसांना दिली. नागपुरात गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी चोरी केली होती. एका जिल्ह्यात चोरी केल्यानंतर ते आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलत असत.