Marathi Sahitya Sammelan : वर्धा येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली. या सांगता समारोपानंतर संमेलनात दहा ठराव घेण्यात आले. या ठरावातून प्रामुख्याने राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत एकसूत्रीकरण असावे आणि त्यांना किमान वेतन कायदा सक्‍तीचा करावा. शिवाय पुस्तकांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी प्रकाशकांना छपाई आणि कागद खर्चात सबसिडी देण्यात यावी. तसेच त्यांना जीएसटीमधून वगळण्यात यावे यासाठी प्रयत्न करावा असा ठरावा करण्यात आला. 

  
ठराव क्रमांक एक
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर साहित्य, नाट्य, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील ज्या दिग्गज व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन करून हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्‍यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडत आहे. 


ठराव क्रमांक दोन 
विदर्भ साहित्य संघाचे अर्ध्वयू ज्‍यांनी हे संमेलन घेण्याचा प्रस्ताव मांडला होता, ते कै. मनोहर म्हैसाळकर यांच्या दुःखद निधनाबद्दल हा विशेष दुखवट्याचा ठराव हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे. 


ठराव क्रमांक तीन 
राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत एकसूत्रीकरण असावे, त्यांना किमान वेतन कायदा सक्‍तीचा करावा, अशी मागणी हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठरावाद्वारे करत आहे. 


सूचक : श्री अशोक बेंडखळे 
 अनुमोदक : श्री रमेश वंसकर 


ठराव क्रमांक चार
पुस्तकांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी प्रकाशकांना छपाई आणि कागद खर्चात सबसिडी देण्यात यावी. तसेच त्यांना जीएसटीमधून वगळण्यात यावे यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठरावाद्वारे करत आहे. 
सूचक : डॉ. नरेंद्र पाठक
अनुमोदक : श्री प्रकाश पागे 


ठराव क्रमांक पाच  
कोणत्याही कारणास्तव राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये रूपांतर केले जाणार नाही. यासाठी विधिमंडळात कायदा करण्यात यावा, अशी मागणी हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठरावाद्वारे करत आहे. 
सूचक : श्री विलास मानेकर
अनुमोदक : श्री प्रकाश पायगुडे 


ठराव क्रमांक सहा
महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा अस्तंगत होत आहेत. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने ‘बोलीभाषा विकास अकादमी’ स्थापन करावी, अशी मागणी हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठरावाद्वारे करत आहे. 
सूचक : डॉ. दादा गोरे
अनुमोदक : प्रकाश होळकर 


ठराव क्रमांक सात 
राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्ट क्रमांक 13 नुसार महाराष्ट्राबाहेरील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्थांना रु. 5 लाख अनुदान प्रतिवर्षी वित्तीय वर्षाच्‍या सुरुवातीला देण्यात यावे, अशी विनंती या ठरावाद्वारे हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करत आहे. 
सूचक : डॉ. विद्या देवधर
अनुमोदक : श्री पुरुषोत्तम सप्रे 


ठराव क्रमांक आठ
बृहन्महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा आणि हैदराबादमधील मराठी साहित्य परिषदेतर्फे चालविण्यात येणारे मराठी महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शिक्षण संस्थांना शासनाने त्वरित अनुदान देऊन त्या चालू ठेवण्यास सहकार्य करावे, अशी विनंती हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे. 
सूचक : डॉ. विद्या देवधर
अनुमोदक : अमृत केशव आकरे 


ठराव क्रमांक नऊ 
म्हादई नदी प्रामुख्याने गोव्यातून वाहते. ती कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी वळविण्याचा प्रयत्न होतो आहे. ही नदी वळविल्यास पाण्याची तीव्र टंचाई होईल. म्हणून ही नदी न वळवण्याचा विचार व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करावी, असा ठराव हे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करत आहे. 
सूचक : श्री. रमेश वयस्कर
अनुमोदक : श्री राजमोहन शेटिये 


ठराव क्रमांक दहा 
पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कारासाठी मराठी ग्रंथांची निवड करताना ते ग्रंथ व्यवस्थित वाचूनच निर्णय घ्यावा आणि पुरस्कार जाहीर केल्यानंतर शासनाने तो परत घेऊ नये, अशी मागणी 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे. 


सूचक : डॉ. मिलिंद जोशी  


अनुवादक : श्री. किरण सगर