ठाणे : जीवनावश्यक वस्तू व कच्च्या मालाचा बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्याने भिवंडी येथील एका कंपनीतून सुमारे 94 लाखांचं तेल, डाळ, असा माल काल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, कंपनीविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या साठ्यासही सील करण्यात आले आहे.

 

भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे केबिन केअर प्राईव्हेट या कंपनीत मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंचा साठा विनापरवाना करून ठेवला होता. यावेळी याठिकाणी वनस्पती तेल, पामोलीन, तेलबिया, शेंगदाणा लाल, आणि शेंगदाणा तुकडा असे 20 लाख 42 हजार 61 रुपये किंमतीचा 149 क्विंटल तेलसाठा आढळला.



याशिवाय मूग डाळ, चना डाळ, तुकडा डाळ, अख्खा डाळ, मसूर डाळ, आटा, बेसन, वाटाणा, मठ डाळ असा 70 लाख 77 हजार 917 रुपये किंमतीचा 726 क्विंटल साठा केलेला दिसला. याव्यतिरिक्त 2 लाख 41 हजार 410 रुपये किंमतीचे 64 क्विंटल गूळ आणि साखरही विना परवाना साठा करून ठेवलेले आढळले.

 

कंपनीचे व्यवस्थापक मुथ्यू वलीअप्पन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा आवश्यक तो घाऊक आणि किरकोळ साठ्याचा परवाना देखील नव्हता.



विशेष म्हणजे या कंपनीत आवक, जावक, शिल्लक असे कुठलेही रजिस्टर ठेवलेले नव्हते, तातडीने पोलिसांकडे कंपनी संचालक टी.डी.मोहन यांच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि या संपूर्ण साठ्याला सील लावले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी सांगितले.