सांगली : पैशांच्या तगाद्यामुळे एका सोने कारागीर वृद्धाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी सांगलीच्या 8 सराफा व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. हरीचंद्र नारायण खेडेकर(82) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी खेडेकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यात फसवणूक, धमकी आणि आर्थिक नुकसान, मानसिक त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या चिठीच्या आधारे आणि खेडेकर यांच्या मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
विशेष म्हणजे खेडेकर यांची फसवणूक करणाऱ्यांमध्ये त्याच्या भावकीतील लोकांचा देखील समावेश आहे. सोने कारागीर असलेल्या हरीचंद्र यांना जवळच्या लोकांनी त्यांच्या वृद्धपणाचा गैरफायदा घेत त्याची फसवणूक केली होती. फसवणूक केल्याचा हरीचंद्र खेडेकर यांना धक्का बसला होता. त्यातून या लोकांकडून त्यांना धमकी, मानसिक त्रास दिला गेला, ज्याला कंटाळून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली अशी माहिती हरीचंद्र खेडेकर यांच्या मुलीने दिलीय.
सांगली शहरातील वयोवृद्ध हरीचंद्र खेडेकर यांनी 7 फेब्रुवारी रोजी हरभट रोडवरील सराफ दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्येपूर्वी खेडकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती . या चिठ्ठीमध्ये खेडेकर यांनी आपण फसवणूक, सावकारी, आर्थिक नुकसान, धमकी यास कंटाळून आणि मानसिक त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता.
या आत्महत्या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यांमध्ये आठ सराफ व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये मधुकर खेडेकर, श्रीकांत खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजु शिरवटकर, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार आणि सुनिल पंडित या सराफांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि सावकारी कायदा अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी ही माहिती दिली आहे.