जळगाव : सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर चौधरी यांनी अनोखं संशोधन केलं आहे. बॅटरीवर चालणारी सायकल आणि सूर्यप्रकाशावर चालणारी रिक्षा चौधरींनी तयार केली आहे. रावेर तालुक्यातील खिरोदा गावचे रहिवासी असलेले चौधरी हे आता 80 वर्षांचे आहेत.


वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यानंतर साधरणत: शरीर थकून जातो. हा आयुष्याचा शेवटचा काळ मानला जातो. मात्र, शरिराच्या थकव्यावर मात करुन सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर चौधरी यांनी अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद काम केलं आहे.



बॅटरीवर चालणारी सायकल आणि सूर्यप्रकाशावर चालणारी रिक्षा तयार करुन युवा संशोधकांसमोर मधुकर चौधरी यांनी आदर्श निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वीज निर्मिती करुन चौधरींनी एमएसईबीच्या भारनियमनावरही मात केली आहे आणि वीज बिलाला कायमचा राम राम ठोकला आहे. घरी सर्व यशस्वी प्रयोग केल्यानंतर ते परिसरातील नागरिकांना सौरउर्जेसंदर्भात मार्गदर्शन करत आहेत.

मधुकर चौधरी हे विज्ञानाचे प्राध्यापक होते. सेवेतून निवृत्त होऊन त्यांना 20 वर्षे पूर्ण झाली. मात्र, विज्ञान आणि प्रयोगाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पेट्रोल-डिझेलचा खर्च आणि इंधनापासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी गेल्यावर्षी बॅटरीवर चालणारी सायकल यशस्वीपणे बनवली. त्यात त्यांना यश मिळाल्याने रिक्षा बनवण्याचा निर्णय घेतला.



गावातील्या जितेंद्र चौधरी या कारागिराला मार्गदर्शन करुन त्यांनी सौरउर्जेवर चालणारी रिक्षा तयार केली. ही रिक्षा बनवण्यासाठी त्यांना दीड लाख रुपयांचा खर्च आला. मात्र, कोणतेही इंधन लागत नसल्याने त्यांच्या या संशोधनाबाबत त्यांना आनंद झाला आहे.

सूर्यप्रकाशाचा वापर करुन वीज निर्मिती केल्यास ती सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आहे. हे सारं सिद्ध करण्यासाठी त्यांनी 45 हजार रुपये खर्च करुन स्वत:च्या घराला लागणारी वीज सौरउर्जेच्या पॅनेलच्या साहाय्याने स्वतःच तयार करुन एमएसईबीच्या भारनियमनाला आणि वीज बिलाच्या कटकटीला कायमचा रामराम ठोकला.

वयाच्या 80 व्या वर्षी इतक्या उमेदीने नवनव्या गोष्टी करण्याचा मधुकर चौधरी यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवणारा आहे. शिवाय, सरकारनेही आता मधुकर चौधरी यांच्या या यशस्वी प्रयोगांना पाठबळ देण्याची गरज आहे.