सातारा : शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा अनुभव आला. शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गोंधळामुळे शरद पवारांनी भाषण थांबवलं.

माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले.

यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी 'सर्व सांगा, खरं सांगा', असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांना मध्यस्थी करत सर्वांना खाली बसण्यास विनंती केली. खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शरद पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले.

शेखर गोरे यांची प्रतिक्रिया

"आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत," असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

कोण आहेत शेखर गोरे?

माण तालुक्यातील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा शेखर गोरे यांच्यावर आरोप होता. गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. इतरही काही गुन्हे त्यांच्यावर नोंद होते. तेव्हापासून शेखर गोरे फरार झाले. जवळपास एक वर्षभर ते फरार होते. स्थानिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंततर जिल्हा न्यायालय आणि पुढे मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जामीनासाठी प्रयत्न केला. उच्च न्यायालयाने त्यांना कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आणि माण तालुक्यात जायला बंदी घातली.

काही दिवसांपूर्वी...म्हणजे मागील महिन्यात शेखर गोरे पोलिसांसमोर हजर झाले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली आणि वडूज या खटाव तालुक्यातील न्यायलयात हजर केले. तिथे त्यांना लगेच जामीन मिळाला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याकडे माण तालुक्याच नेतृत्व सोपवलं होतं. कॉंग्रेसचे माण तालुक्यातील आमदार जयकुमार गोरे यांचा सख्खा भाऊ असलेल्या शेखर गोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने फोडलं आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात बळ दिलं. मात्र 2014 ची निवडणूक ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करुन त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली. मात्र त्यामधेही कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. मागील वर्षभरापासून पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे होता. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांना दिलासा मिळाला होता.

वेबसाईट व्हिडीओ


यू ट्यूब व्हिडीओ