60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 02:27 PM (IST)
नागपूर : दसऱ्याबरोबरच आज 60वा धम्मचक्र प्रवर्तन दिवसही नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दीक्षाभूमीवर भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 साली विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घडवून आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासनाने राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी याठिकाणी खास सोय केली आहे. दरम्यान, दीक्षाभूमीचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून स्तुपाला पंचशील ध्वजाने सजवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनतर्फे खास मोहीम राबवण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर येताना हार, फुलं घेऊन येण्याऐवजी वही आणि पेन आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ह्या वह्या आणि पेन गोळा करुन, गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.