मुंबई : नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राज्यातील 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द कऱण्यात आली आहे. तसंच सुमारे सव्वा लाख संस्थांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच धर्मादाय आयुक्तांकडून अशा संस्थांवर इतकी कडक कारवाई करण्यात आली.


याआधी जी काही चार्जेबल ट्रस्टची हॉस्पिटल्स होती, त्यात रुग्णांना स्वस्तात उपचार न पुरवणाऱ्या संस्थांवर कारवाईचा बडगा धर्मादाय आयुक्तांनी उचलला आहे. यात नागपूरमधील जवळपास 14 हजार ट्रस्ट्सचा समावेश आहे. तर लातूरमध्येही सुमारे 5 हजार संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील जवळपास साडेचार हजार संस्थांची नोंदणीही धर्मादाय आयुक्तांनी रद्द केली आहे.

धर्मादाय संस्थांना यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. मात्र संस्थांनी हिशेब आणि संस्थेची अन्य माहिती धर्मादाय आयुक्तांना दिली नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द तर, जवळपास सव्वा लाख संस्थांना नोटीस बजावली आहे.