सातारा : आईसोबत शेळ्या राखायला गेलेला सहा वर्षाचे चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आहे. ही घटना साताऱ्यातील विरळी या गावात घडली. मंगेश जाधव असे या चिमुकल्याचं नाव आहे.
साताऱ्याच्या माण तालुक्यामधील विरळी गावातील महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन शेळ्या राखन्यासाठी माळरानावर गेली होती. खेळता-खेळता हा मुलगा उघड्यावर असलेल्या बोरवेलमध्ये पडला. आईसमोरच घडलेल्या घटनेमुळे तिनं मोठ्यानं मुलाला वाचवण्य़ासाठी आरडाओरडा केला. त्यामुळे गावातील लोक घटनास्थळी धावत आले.
तातडीनं जेसीबीच्या मदतीनं लहानग्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले. मंगेश बोअरवेलमध्ये पडला तेव्हा दहा फुटावर अडकला होता, मात्र जेसीबीनं खोदकाम सुरु केल्यावर जेसीबीच्या हादऱ्यानं तो 17 फुटावर गेला.
सध्या त्या मुलाचा आवाज ऐकू येत आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत अग्नीशामन दलाची टीम कर्मचारी जागेवर नसल्यामुळे घटणास्थळी दाखल झाले नव्हते. सध्या या मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.