लातूर : उदगीरच्या एसटी महामंडळाच्या डेपोमधून मोठ्या प्रमाणावर जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी उदगीर एसटी डेपोचा कॅशिअर दिलीप बिरादारला निलंबित करण्यात आलं आहे. जवळपास सहा लाखाहून जास्त रक्कम आगारातून बदलून देण्यात आली आहे.


ज्यादिवशी नोटाबंदीचा निर्णय जाहिर करण्यात आला त्याच दिवशी या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. शहरातील एका व्यापाऱ्यास या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. उदगीर डेपोमध्ये दररोज लाखोंची उलाढाल होत असते. या साऱ्या उलाढालीचा हिशोब रोखपाल ठेवत असतो. पण रोखपालानेच नोटा बदलून दिल्यानं हे प्रकरण उजेडात आलं नव्हतं.

या व्यवहाराची चर्चा वाढल्यानंतर आगारप्रमुख एस आर बाशा यांनी कॅशिअरला लगेच निलंबित केलं आहे. तसंच त्यानं नेमकी किती रक्कम बदलली आहे याची चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

"चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणावर बोलता येईल. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल." असं बाशा यांनी सांगितलं. मोजणी पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असंही आगार प्रमुख एस आर बाशा यांनी स्पष्ट केलं.