अहमदनगर : अहमदनगरमधील पांगरमल दारुकांडाप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या 6 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. यात एक पोलीस उपायुक्त, दोन उपनिरिक्षक आणि तीन जवानांचा समावेश आहे. आपल्या कामात हलगर्जी दाखवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पांगरमलमध्ये विषारी दारुमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कौडगावला दोघांना आपला जीव गमावावा लागला आहे.


अहमदनगरमधील पांगरमल दारुकांड प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तिघांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. जाकीर शेख, हनीफ शेख, जितू गंभीर आणि शेखर जाधवला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलं, तर मोहन दुग्गलचा मुलगा सोनू आणि भरत जोशीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.  सर्वांची पोलीस कोठडी संपल्यानं बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी बनावट दारु साठी कच्चा माल कुठून आणला यासह अजून तपास करायचा असल्यानं त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली.

या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील दादा वाणीनं अल्कोहोल पुरवल्यानं त्याला गुन्ह्यात समावेशासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्याचबरोबर दारुच्या बाटल्या भंगाराच्या दुकानातून घेतल्यानं त्याचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. दारु बनवण्यासाठी मिथेनॉलचा वापर झाल्याचं आढळल्यानं त्या संदर्भात कसून चौकशी सुरु आहे, तर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यपानाने आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. बनावट दारु प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे.  शिवसेना उमेदवारानं दिलेल्या पार्टीमध्ये दारु प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचले आहेत. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं होतं.

कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं होतं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला होता. त्यामुळे यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते. पण आता संशयितांच्या अटकेसोबतच राज्य उत्पादन शुल्कच्या 6 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :


अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातच बनावट दारुचा अड्डा

शिवसेना उमेदवाराच्या पार्टीत अतिमद्यपान, तिघांचा मृत्यू

अहमदनगर दारुकांडातील तीन फरार आरोपींना नांदेडमधून अटक