5th August Headline : आज राज्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा 122 वा दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. 


संभाजी भिडेंच्या मुद्यावरून पुण्यात आज राडा?
 


पुणे - संभाजी भिडे यांच्या समर्थकांकडून सकाळी बालगंधर्व चौकात भिंडेच्या समर्थनार्थ आंदोलन आणि भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यास परवागी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आलीय.  याला भीम आर्मीकडून विरोध करण्यात आलाय.  तर भिडेंच्या विरोधात बालगंधर्व चौकात आंदोलन करण्याची परवानगी सकाळी दहा वाजता आपल्याला देण्यात यावी असे निवेदन भीम आर्मी कडून पोलीसांना देण्यात आलय. 
 


महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक


लवकरच राज्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या अनुषंगाने नेहरू तारांगण येथे सकाळीमहाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र शरद पवार यांनी आपण वारंवार महाविकास आघाडीच्या सोबतच आहोत याची स्पष्टता दिली आहे. 
 


महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा 122 वा दीक्षांत समारंभ


नाशिक :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा 122 वा दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. 349 पुरुष आणि 145 महिला आणि गोवा राज्याचा 1 असे एकूण 494 पोलीस उपनिरीक्षकानी खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. गृहमंत्रीच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे. 


श्रीनगरमध्ये भाजपची विजयी यात्रा 


श्रीनगर- कलम 370 रद्द केल्याच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजप विजयी पदयात्रा काढणार आहे. केंद्र सरकारने 4 वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले होते


 
मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा - 


सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सकाळी 6.30 वाजल्यापासून  मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. 



बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस


मुंबई- गेल्या तीन दिवसांपासून बेस्टच्या काही डेपोतील कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज आंदोलनाचा चौथा दिवस असून कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याचा फटका सामान्य मुंबईकर प्रवाशांना बसताना बघायला मिळत आहेत. सोबतच काहीशी बेस्टची वाहतूक प्रभावित झालेली आहे.  आजपासून बेस्टच्या 6 डेपोला प्रत्येकी 25 याप्रमाणे 150 बसेस एसटीने पुरविलेल्या आहे. तर, सायंकाळी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेळावा मुंबई मराठी पत्रकार संघाजवळ आयोजित करण्यात आला आहे.