बारामती : कोणतीही नवीन गोष्ट करण्याची वयाची मर्यादा नसते. मनातली इच्छा पुर्ण करण्यासाठी जिद्द असली की पुरेसं असतं. बारामतीत 51 वर्षांचे कीर्तनकार दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. सुमारे 35 वर्षांपूर्वी मागे सोडलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास बाबासाहेब खारतोडेंनी घेतला आहे.


बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावामधल्या न्यू इंग्लिश स्कूल परीक्षा केंद्रावर वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या परीक्षा केंद्रावर धोतर, टोपी, नेहरु शर्ट घातलेले 51 वर्षांचे गृहस्थ दहावीची परीक्षा द्यायला हजर झाले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांपेक्षाही वयाने अधिक असलेले हे परीक्षार्थी पाहून उपस्थितही अवाक झाले.

बालवयात शिक्षणाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न बाबासाहेब खारतोडे पूर्ण करत आहेत. हे सध्या आपल्या मुलांच्या मार्गदर्शनाखाली दहावीची परीक्षा देत आहेत.

'मला या वयात शिक्षण घेऊन नोकरी करायची नाही. माझे मराठी व हिंदी हे विषय चांगले आहेत पण इंग्रजीत मी जरा कच्चा आहे. मला इंग्रजी बोलता यावे आणि भविष्यात इंग्रजीतून कीर्तन करता यावं, याच उद्देशाने मी शिक्षण पूर्ण करत आहे' असं बाबासाहेबांनी सांगितलं.

लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती, मात्र चौथीत असताना खेळताना विजेचा शॉक लागला. अंगावर असलेल्या जखमांचा वास येत असल्याने माझ्याशेजारी विद्यार्थी बसत नव्हते. चौथी ते नववी पर्यंत एका कोपऱ्यात बसून, अंगावर शाल घेऊन शिक्षण घेतलं, असं बाबासाहेब सांगतात.

कुटुंबाचा वारकरी संप्रदायाचा वारसा सांभाळण्यासाठी आळंदीला गेलो आणि धार्मिक शिक्षण घेऊन कीर्तनकार झालो. अभ्यासाची आवड होती मात्र शैक्षणिक शिक्षण नसल्याने खंत वाटायची. सध्या 17 नंबरचा फॉर्म भरुन आता मी दहावीची परीक्षा देत असल्याचं ते सांगतात.