सोलापूर : कर्तव्यावर असताना मोबाईलवर बघणे किंवा मोबाईलवर बोलत बसणे पोलिसांना आता चांगलेच महागात पडणार आहे. सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कामावर असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यावर असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.
सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, अधिकारी सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्तव्यावर असताना कर्तव्य सोडून मोबाईल बघत असतात किंवा मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले होते.
कर्तव्यावर असताना मोबाईलवर पाहणे अयोग्य आहे. तरी यापुढे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंडाच्या शिक्षेची कारवाई करण्यात येईल, असे आदेशाद्वारे कळवण्यात आले आहे.
सोलापूर आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अंकुश शिंदे यांनी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच कामात कसूर केल्यामुळे एका फौजदारासह 9 कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई आयुक्तांनी केली.
दोन दिवसापूर्वी तब्बल 207 पोलिसांच्या बदलीचाही निर्णय त्यांनी घेतला. रात्री 10.30 नंतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही, याबाबत शहरात विशेष काळजी घेतली जात असल्याने आयुक्तांच्या नावाप्रमाणे गुन्हेगारीवर 'अंकुश' ठेवण्यात यश मिळत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.