मुंबई : अंतिम संस्काराला (Cremation) हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, यातून कोणी व्यवसाय उभा करेल आणि त्यातून लाखोंची उलाढाल करेल यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, मुंबईतील एका उद्योजकाने या अंतिम संस्कारातून 19 लोकांना रोजगार दिलाय. शिवाय हा उद्योजक लोकांच्या अंतिम संस्कारातून वर्षाला 50 लाख रूपयांचे उत्पन्न मिळवत आहे.
लोकांच्या अंतिम संस्कारातून आपली कंपनी उभा राहू शकते? त्यातून लाखोंचे उत्पन्न आपण काढू शकतो? लोकांना रोजगार देऊ शकतो?...'हो' हे सगळं होऊ शकतं आणि हे शक्य करून दाखवलय मुंबईतलील उद्योजक संजय रामगुडे यांनी. संजय रामगुडे आणि त्यांची सुखद अंतिम संस्कार ही कंपनी ठाण्यातील बिजनेस जत्रेत चर्चेचा विषय ठरलेत. ही कंपनी मृत्यूनंतर अंतिम संस्काराची पूर्ण जबाबदारी घेत आहे.
कशी सुचली कल्पना?
"आपला किंवा आपल्या जवळच्या कोणाचा मृत्यू झाल्यानंतर अंतिम संस्काराच्या विधीपासून ते सर्व साहित्यापर्यंत, अगदी रूग्णवाहिकेपासून ते तिरडीपर्यंत सगळं काही रेडिमेट देणारी ही अंतिम संस्कार कंपनी आहे. शहरात एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने मृत्यूनंतर आपलं काय होणार? आपले अंतिम संस्कार कसे होणार? अशा चिंतेत अनेक जण असतात. मृत्यूनंतर विधिवत अंतिम संस्कार करून सुखात व्यक्तीला निरोप देता यावा आणि ही चिंता दूर व्हावी याची जबाबदारी या कंपनीने स्वीकारली आहे. यासाठी अंतिम संस्काराचे आठ हजारापासून ते 38 हजारापर्यंत पॅकेजेस देखील ठेवले आहेत.
अनेकांची मुलं परदेशात शिकायला किंवा नोकरीला असतात. अशावेळी कोणाचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्काराची जबाबदारी ही कंपनी स्वीकारते. 2014 पासून ही कंपनी कार्यरत असून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागात कंपनीचं काम चालतं. आतापर्यंत 5000 अंतिम संस्कार या कंपनीने केले असून कोरोना काळात 300 च्या जवळपास अंतिम संस्कार या कंपनीने केले आहेत. शिवाय 19 जणांना रोजगार देण्याचे काम करून 50 लाखांपर्यंत उत्पन्न ही कंपनी मिळवत आहे, अशी माहिती सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिटेडचे मालक संजय रामगुडे यांनी दिली.
गेल्या आठ वर्षांपासून रामगुडे यांची कंपनी अंत्यसंस्काराचे काम करत आहे. सध्या भारतामध्ये असे काम करणारी ही एकमेव कंपनी आहे. लाखो रुपये कमवणारी ही कंपनी ठाण्यातील बिजनेस जत्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.