नागपूर : राज्यात रविवार (17 एप्रिल) हा घातवार ठरला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागांमध्ये झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले आहेत. नागपूर, नाशिक आणि सांगलीमध्ये हे अपघात घडले. मृतांमध्ये एका पाच वर्षीय चिमुकल्यासह पोलिसाचा समावेश आहे.
नागपुरात कारने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
नागपुरात अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बोलेरो आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बाईकवर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात जुनोना फुके गावाजवळ काल (17 एप्रिल) रात्री हा अपघात झाला. बाईकवरील तिघे मध्य प्रदेशातून नातेवाईकांच्या घरातून नागपूर जिल्ह्यातील आपल्या गावाकडे परत येत होते. त्याचवेळी लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बोलेरोने समोरुन येणाऱ्या बाईकला धडक दिली. या धडकेत तीन बाइकस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकमधील अपघातात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू, सात जखमी
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही कारमधील सात प्रवासी जखमी झाले. यामध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. नाशिक शहरातील एबीबी सिग्नलवर महिंद्रा झायलो आणि मारुती ब्रीझा या दोन कारचा अपघात झाला. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी
मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी आणि बुलेट अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर शिरढोणजवळ हा काल (17 एप्रिल) संध्याकाळी अपघात झाला. चार चाकी वाहनाची बुलेट मोटरसायकलला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलीस अंमलदार जागीच गतप्राण झाले आहेत. प्रवीण बाबाराम सोनवणे वय 43 वर्षे असं मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाचं नाव आहे. प्रवीण बाबाराम सोनवणे हे मोटरसायकलवरुन सांगोलाहून सांगलीकडे निघाले होते. तर चार चाकी वाहन मिरजहून सोलापूरकडे निघाले होते. उत्तम सिमेंट कारखान्याजवळ असलेल्या पुलावर आले असता समोरुन येणाऱ्या मोटर सायकलला चारचाकी वाहनांची जोराची धडक बसली. यात प्रवीण सोनवणे यांना डोक्याला आणि पायाला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.