नांदेड : देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्रातील अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशा शाहिद परिवाराच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने 5 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अन राज्यात शाहिदच्या परिवाराला मोफत जमीन देण्याचा पहिला मान नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे.

संभाजी कदम हे 29 नोव्हेंबर 2016 साली मातृभूमीचे रक्षण करताना काश्मीरमध्ये नागरोटा इथे शाहिद झाले. कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती शहीद झाल्याने आता शहीद संभाजी कदम यांचे आई, वडील, पत्नी आणि मुलीचे काय होणार असा प्रश्न होता.

राज्य सरकारने 28 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील शहीदांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी केली. शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन खरबी या गावात मोफत दिली आहे. राज्यात शहीदांच्या कुटुंबाला मोफत जमीन देण्याचा पहिला मान देखील नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे.

सरकारच्या योजनेमुळे आपल्याला 5 एकर जमीन मोफत मिळाली आहे. त्यामुळे आता परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही या जमिनीवर शेती करू असे वीरपत्नी शीतल संभाजी कदम यांनी सांगितले आहे. तर आपल्या गावातील शासकीय जमीन एका वीरपत्नीला मिळाल्याचा आम्हाला अभिमान असल्याचं गावकरी सांगत आहेत. शहीद परिवाराला लागेल ती  मदत करण्याचे आश्वासनही खरबी ग्रामस्थांनी दिले आहे.
2018 पर्यंत विभागनिहाय शहिदांची संख्या

मराठवाडा - 90

विदर्भ - 98

पश्चिम महाराष्ट्र - 445

कोकण - 101

मुंबई - 41

उत्तर महाराष्ट्र - 62