अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोटच्या धीरज कळसाईत या तरूण गिर्यारोहकानं आफ्रिका खंडातील टांझानियाच्या माऊंट किलीमांजारोवर तिरंगा मोठ्या डौलानं फडकावला आहे. विशेष म्हणजे धीरज हा दिव्यांग आहे. तो एक हात आणि एका पायाने पूर्णत: अपंग आहे. यापूर्वी धीरजने कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावनखिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. किलीमांजारो शिखर सर केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहे.
किलीमांजारो हा आफ्रिका खंडातील चढाईस अतिशय कठीण पर्वत आहे. हा पर्वत समुद्रसपाटीपासून 19 हजार 341 फूट म्हणजेच 5 हजार 895 मीटर आहे. हा जगातील सर्वात उंच पर्वत असून, बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमस्खलन होत असते. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक आहे. नियतीनं धीरजचा एक हात अन एक पाय हिरावला असतांनाही त्याने या यशाला गवसणी घातली आहे.
धीरज हा मुंबई येथून आपल्या चमूसह 21 ला टांझानियाला रवाना झाला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पूर्वतयारी करून सर्व साहित्यासह बेस कॅम्प पार करीत 23 जानेवारी रोजी किलीमांजारो शिखराच्या चढाईला सुरुवात केली. चढाईतील अनेक आव्हानात्मक टप्पे पार करीत धीरज 26 जानेवारीच्या पहाटे किलीमांजारो शिखरावर पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर धीरजने माऊंट किलीमांजारोवर भारतीय तिरंगा डौलानं फडकावला.
ही मोहीम पुणे पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांचा नेतृत्वाखाली राबविण्यात आली. दिव्यांग धीरज कळसाईत सोबतच पिंपरी चिंचवडचा नऊ वर्षीय साई कवडे, मुंबईच्या प्रियंका गाडे, नवी मुंबई पोलीस दलातील व साताराचे मूळ रहिवासी तुषार पवार यांनीदेखील ही मोहीम यशस्वी पूर्ण केली. या मोहिमेसाठी ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांनी विशेष सहकार्य केले.
धीरजची जिगरबाज यशोगाथा
धीरज अकोटमधील एका दाळमिलमध्ये कामाला होता. याा मिलमध्ये एका घटनेनं जन्मत:च डाव्या हातानं अपंग असलेल्या धीरजवर नियतीनं आणखी एक आघात केला. दाळमिलच्या मशिनवर काम करतांना धीरजचा तोल जावून तो चाळणी मशिनमध्ये पडला. यात त्याचा डावा पाय निकामी झाला. त्याचा डावा पाय कापावा लागला. नियतीनं जागतिक अपंगदिनीच त्याच्यावर परत दुहेरी अपंगत्व लादलं. यामुळे धीरज आणि त्याचे कुटुंब अक्षरश: कोलमडून गेले. याचदरम्यान अकोल्यातील एका कार्यक्रमातील एका अपंग मुलीच्या भाषणानं त्याला आयुष्याचे नवं ध्येय सापडलं. तेंव्हापासून त्यानं कधी मागं वळूनच पाहिलं नाहीय. त्यानं गेल्या तीन वर्षांत नरनाळा, पावनखिंड, कळसूबाई, लिंगाणा, सुधागड अन आता माऊंट किलीमांजारो अशी एकाहून एक खडतर अन कठिण ठिकाणी यशस्वी चढाई केली आहे.
आता लक्ष्य माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं
धीरजचं कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अकोटमधील श्रीराम नगरात राहात आहे. 17 वर्षांपूर्वी ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावातून अकोटमध्ये रोजगारासाठी अकोटमध्ये आले होते. धीरजचा आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पत्र्याच्या घरात राहणारं हे कुटुंब भूमिहीन असून, वडील मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आर्थिक स्रोत नसल्याने 2015 मध्ये बहिणीचे शिक्षण थांबले. धीरजने आर्थिक संकटाला तोंड देत मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या दृढनिश्चयाने त्याने किलीमांजारो शिखर सर केल्यानंतर आता तो जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहे.
अकोल्याच्या दिव्यांग धीरजनं माऊंट किलीमांजारोवर तिरंगा फडकावला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2019 12:47 PM (IST)
चढाईतील अनेक आव्हानात्मक टप्पे पार करीत धीरज 26 जानेवारीच्या पहाटे किलीमांजारो शिखरावर पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर धीरजने माऊंट किलीमांजारोवर भारतीय तिरंगा डौलानं फडकावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -