वर्धा : हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीविरोधात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. हिंगणघाट इथं कॉलेजला जात असलेल्या प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. नागपूरच्या रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला अटक केली. त्यानंतर प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत पुरावे गोळा करण्यात आले. शुक्रवारी घटनेपासून 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय.


हिंगणघाट जळीतकांड | आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हिंगणघाटच्या निर्भयानं 7 दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिली. मात्र, 10 फेब्रुवारीला पहाटे उपचारादरम्यान नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326(a)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय.

BLOG : कायदे बदलून महिलांवरील अत्याचार थांबतील का?

जळीतकांड ते दोषारोपपत्र कशा घडल्या घटना -
03 फेब्रुवारी सका 7.15 वा – पीडित मुलगी कॉलेजमधे जात असताना आरोपी विकेश नगराळे यानं हिंगणघाटमधे नंदोरी चौकात पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ज्यामधे मुलगी 40 टक्के जळाली.
03 फेब्रुवारी सका 9 वा – प्रथमोपचारानंतर पीडितेला नागपुरच्या ऑरेंजसिटी रूग्णालयात दाखल केलं.
03 फेब्रुवारी सका 9.30 वा –एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर सगळीकडे वणव्यासारखी बातमी पसरली आणि त्यानंतर समाजातून सर्वत्र निषेध आणि चीड व्यक्त करायला सुरुवात.
03 फेब्रुवारी सका 11.45 वा –आरोपी विकेश नगराळे याला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून ताब्यात घेतलं.
03 फेब्रुवारी दुपा 3 वा –हिंगणघाटमधे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. शहरात बंद करायला सुरूवात.
04 फेब्रुवारी सका 11 वा – ऑरेंज सिटी रूग्णालयाचं मेडिकल बुलेटिन –पीडितेची प्रकृती चिंताजनक. कृत्रिम श्वासोच्छवास सुरू.
04 फेब्रुवारी दुपा 5 वा - गृहमंत्री अनिल देशमुख हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित मुलीच्या उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांसह नागपूरकडे रवाना. पीडितेच्या परिवाराची भेट घेतली.
05 फेब्रुवारी सका 9.30 वा मेडिकल बुलेटिनमध्ये माहिती. मुलीनं हात हलवून आईशी इशाऱ्याद्वारे संवाद साधला. प्रकृती मात्र चिंताजनक.
06 फेब्रुवारी –हिंगणघाटमधील घटनेच्या निषेधार्थ वर्धा बंदचं आवाहन.
06 फेब्रुवारी सका 11.30 वा –पीडितेचं मेडिकल बुलेटिन –प्रकृती स्थिर मात्र शरीरात जंतुसंसर्ग पसरायला सुरुवात झाल्यानं डॉक्टर अधिक सतर्क.
07 फेब्रुवारी दुपा 12 वा –पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमधे माहिती. आतापर्यंत तीन ऑपरेशन्स केले असले तरी परिस्थिती गंभीरच.
08 फेब्रुवारी सका 6 वा –हिंगणघाट प्रकरणातल्या आरोपीला पहाटेच पोलिसांनी न्यायालयात हजर केलं.
08 फेब्रुवारी संध्या 6 वा –मेडिकल बुलेटिन अपडेट –पीडितेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. परिस्थिती गंभीर.
09 फेब्रुवारी दुपा 1 वा –पीडितेचं मेडिकल बुलेटिन –पीडितेचं ऑपरेशन करुन तिच्या शरीरातील जळालेली त्वचा काढली गेली.
10 फेब्रुवारी सका 6.55 वा –तीन वेळा हृदयघात होऊन हृदय बंद पडलं. पीडितेचा नागपूरच्या ऑरेंजसिटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
10 फेब्रुवारी - पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला कलम 307, 326(a)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
28 फेब्रुवारी - घटनेपासून 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल.

Hinganghat Accused | हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीने तुरुंगात ब्लॅंकेटच्या चिंधीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा