नांदेड : मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमेवरील धर्माबाद तालुक्यातील जवळपास 40 गावांनी तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली आहे. शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या सीमावर्ती भागातील गावांनी व्यथा मांडली आहे. धर्माबादच्या सरपंच संघटनेनं या मागणीसाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे.

धर्माबाद शहरापासून केवळ 10 किलोमीटरवर असलेल्या गावात रस्ते नाहीत. अनेक वर्षांपासून होणाऱ्या रस्त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याची तक्रार गावकरी करतात. त्यामुळे रुग्ण आणि गरोदर महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.पाणी, वीज अशा मूलभूत समस्यांशी अजूनही गावकऱ्यांचा झगडा सुरु आहे.

त्याचवेळी केवळ दीड किलोमीटरवरच्या तेलंगणातील गावांमध्ये थेट शेतापर्यंत रस्ते असल्याचं गावकरी सांगतात. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. याच योजनांचे गावकऱ्यांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. यातूनच महाराष्ट्रापेक्षा तेलंगण बरा असं गावकरी म्हणत आहेत.

निझामाबाद येथे जाऊन तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सताधारी पक्षाचे आमदार बाज रेड्डी गोवर्धन यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. गावकऱ्यांची भावना आमदारांनी मुख्यमंत्र्यांना कळवली. ग्राम पंचायतीचे ठराव घेऊन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी तालुका सरपंच संघटनेने सुरु केली आहे. आक्रमक झालेल्या गावकऱ्यांच्या मागणीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.