पालघर : पालघर जिल्हा ग्रामीण साठी चिंता वाढविणारी बाब पुन्हा समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा आकडा वाढत आहे. पण काल रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डहाणू तालुक्यातील चार नागरिकांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.


पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा व येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

काटाळे येथील वीट भट्टीवर पाच नवीन रुग्ण आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना (इंटरन्स) कोरोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता वीटभट्टीवर असणाऱ्या आणखी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 17 वर पोचली आहे

डहाणू येथे लहान मुलीला करोनाची लागण झाल्याने पालघर तालुक्यातील काटाळे, लोवरे, वांदिवली-खरशेत या गावांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या मार्फत घरोघरी पाहणी सुरू करण्यात आली होती. दरम्यान कासा येथील उपविभागीय रुग्णालय सील करण्यात आले होते.

जिल्ह्यातील 197 नागरिकांचे नव्याने विलगीकरण

हे चार ही रुग्ण डहाणू तालुक्यातील रानशेत गावातील आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 17 रुग्ण झाल्याने आरोग्य विभागासाठी प्रशासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील 197 नागरिकांचे नव्याने विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक जिल्हा वैद्यकीय अधिकारी  डॉ सागर पाटील यांनी दिली आहे.