मुंबई : महाराष्ट्रातील कर्जमाफीचं लोण आता मध्य प्रदेशातही पोहोचलं आहे. मात्र तिथल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात आज 24 तासात तब्बल 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

साताऱ्यातील पळशीमधील सुरेश शंकर साबळे यांनी खासगी सावकार आणि बँकेचे कर्ज असल्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर इथं परमेश्वर वानखेडेंनी आत्महत्या केली.

दुसरीकडे वर्ध्यातील ब्राह्मणवाड्यात ईश्वर बळीराम इंगळेंनी गळफास घेऊन जीवन संपवलं. याशिवाय येवल्यातल्या पिंपरीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या अवघ्या 30 वर्षांच्या नवनाथने मृत्यूला कवटाळलं आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सध्या राज्यात आंदोलनं सुरु आहेत. त्यातच सरकारकडून कर्जमाफीसाठी आश्वासनं दिली जात आहेत. तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत.

एकीकडे सरकारच्या अल्पकर्जधारक, अल्पभूधारक, अमुक सालापर्यंतचे, तमुक सालापर्यंतचे अशा चक्रात शेतकऱ्याचं आंदोलन लांबत चाललं आहे. त्यातच जुनी समिती, नवी समिती, असे घोळ घातले जात आहेत. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार, असा प्रश्न विचारला जात आहे.