औरंगाबादेत 3 वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार, दोन महिला अटकेत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 25 Oct 2016 06:26 PM (IST)
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात अल्पवयीन मुलीला डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. तसंच तिच्या अंगावर सिगारेटने चटकेही देण्यात आले आहेत. कुंटणखाना चालवणाऱ्या दोन महिलांनी हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद शहरातील सिडको एन-9 भागात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना तीन वर्षांची चिमुरडी मुलगी सापडली. या मुलीवर कुंटणखाना चालवणाऱ्या दोन महिलांनी अमानुष अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. मात्र या मुलीवर अत्याचार करण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांच्या दामिनी पथकांनी छापा टाकत मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी या चिमुरडीच्या जन्मदात्या आईलाही ताब्यात घेतलं आहे. तसंच चिमुरडीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिडको एन-९ सारख्या गजबजलेल्या आणि उच्चभ्रू भागात अशा प्रकारचा कुंटणखाना चालतो, याची पोलिसांना इतके दिवस खबर कशी काय लागू शकत नाही, हा प्रश्नही विचारला जात आहे.