नागपुरात कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 12:12 PM (IST)
नागपूर : कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये आई, वडील आणि मुलीचा समावेश आहे. मानकापूर परिसरात असलेल्या दामले कुटुंबातील किशोर दामले (वय 61 वर्ष), अंजली दामले (वय 55 वर्ष), विनिशा काळे (वय 33 वर्ष) दगावले. निवृत्त पोलिस अधिकारी किशोर दामले यांची मुलगी माहेरी आली होती. मुलगी विनिशा कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी गेली असता तिला विजेचा झटका बसला. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी वडील तिथे गेले आणि तेही चिकटले. यानंतर आई या दोघांना वाचवण्यासाठी गेली असता, तिलाही विजेचा झटका बसला. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. कूलर अतिशय जुना असल्याने तसंच त्याचं वायरिंग कुजल्याने विजेचा झटका बसला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.