2nd April Headlines :  महाविकास आघाडीची पहिली सभा आज संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.  आजपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) च्या सावरकर गौरव यात्रेला सुरूवात होणार आहे, त्याशिवाय शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी...


महाविकास आघाडीची पहिली सभा


महाविकास आघाडीची पहिली सभा आज संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय. 


महाविकास आघाडीचे कोण कोण नेते उपस्थित राहणार


-  शिवसेना – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर (दुपारी 4 वाजता पोहचतील.) सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, खासदार बंडु जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, अनिल परब, सुनील प्रभू.


- राष्ट्रवादी – अजित पवार, जयंत पाटील, धंनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, जयप्रकाश दांडेगावकर


-   कॉग्रेस – नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख
 
सावरकर गौरव यात्रा


आजपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) च्या सावरकर गौरव यात्रेला मुंबईत सुरूवात होणार आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबई अशा सर्व विभागात निघणार आहे. या यात्रेत केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे असणार आहेत. 


ठाणे – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. 


सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ भाजपवतीने संध्याकाळी 5 वाजता, रंगभवन चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करून वीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात होणार आहे.


 शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस.  


शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेला गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरूवात होते. शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी. शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते.   या कावडींमध्ये तेल्या भुत्याची मानाची असते. रात्री 12 वाजता सप्त नद्या आणि शिंगणापूर परिसरातील पुष्कर तलावातील पाण्यानं शंभू महादेवाला जलाभिषेक घातला जातो.


पुणे – एमपीएससीसी मार्फत घेण्यात येणाऱ्या टायपींग परिक्षेचे निकष बदलल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.


मुंबई – यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त शरद काळे यांचे पार्थिव आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवल जाणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
 
नाशिक – रामनवमीला रामजन्माचा उत्सव उत्साहात पार पडल्यानंतर दोन दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला श्रीराम आणि गरुड रथ काढण्याची जवळपास 250 वर्षाची परंपरा आजही नाशिकमध्ये कायम असून आज संध्याकाळी 5 वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर, महाआरती आणि रामनामाचा जयघोष करत रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. रथयात्रा सुरु होण्यापूर्वी राममंदिरातून रामाच्या भोगमूर्ती आणि पादुकांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.


मध्य प्रदेश – आदिवासी अधिकारी परिषदेसाठी शरद पवार आज मध्य प्रदेशच्या सिवनी येथे जाणार आहे.


पंढरपूर – आज चैत्री एकादशी सोहळा असून हजारो वारकरी दाखल झालेत. या यात्रेला पळती वारी देखील म्हणतात. शिखर शिंगणापूर येथे शंभो महादेवाचा विवाह सोहळा असल्याने साक्षात विठुराया या विवाहास जातात अशी अख्यायिका असल्याने वारकरी शिखर शिंगणापूर येथे जात असतात. खरे तर आज एकादशी असल्याने सर्व भाविकांचा उपवास असला तरी विठुरायला मात्र पूरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.


कोल्हापूर – मुरगुड गावातील अश्लील व्हिडीओ प्रकरणातील डॉक्टरवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.


चिपळूण (रत्नागिरी) – लोटे येथे भास्कर जाधव यांनी शिवसेनेचा मेळावा आयोजित केला आहे. 
 
नाशिक – नाशिक शिवसेना कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला सकाळी 11 वाजता खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.


अहमदनगर –   ईपीएस 95 पेंशनर्सची पेंशन वाढ आणि इतर मागण्यांसाठी आजपासून खासदारांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह होणार आहे. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अहमदनगर शहरातील कार्यालयासमोर सकाळी हा सत्याग्रह सुरू होणार असून यावेळी भजन - कीर्तन करून हे आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन संसदेचे अधिवेशन सुरू असेपर्यंत चालू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


जळगाव – कापूस पिकासह सर्वच शेतमालाला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील नेरी चौफुलीवर शेतकऱ्यांच्या तर्फे रस्ता रोको आणि धरणे आंदोलन केलं जाणार आहे.


धुळे –  गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर आज जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडणार आहे. यासाठी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.


लातूर – राजू शेट्टी लातूर दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात जनजागृती करण्यासाठी राजू शेट्टी आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे संध्याकाळी 6 वाजता शेतकरी मेळावा घेणार आहेत.


चंद्रपूर – "आमदार आपल्या गावी मुक्कामाला" ही अभिनव संकल्पना चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांनी राबविण्याचा निर्णय घेतलाय. या संकल्पने अंतर्गत आमदार बंटी भांगडीया हे त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावात रात्री मुक्काम करणार आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात 50 गावं निवडण्यात आलेत. या मोहिमेला आजपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा या गावातून सुरुवात होणार आहे. गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.


 अमरावती – शहरातील रवी नगर परिसरात आज हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे, संध्याकाळी 5 वाजता. मागील 10 वर्षांपासून रवी नगर परिसरातील संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी खासदार नवनीत राणासह तब्बल 5 हजाराच्या वरती महिला सहभागी होणार आहेत.


यवतमाळ – पोलीस भरतीसाठी आज 6 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 2405 पुरुष तर 715 महिला पात्र आहे. असे एकूण 3120 जण परीक्षा देणार आहे. पात्र उमेदवार यांना सकाळी 6.30 केंद्रावर यावे लागणार असून त्यांना तपासून आत सोडण्यात येणार आहे. तर सकाळी 9 ते 10.30 दरम्यान दीड तासाचा पेपर राहणार आहे.


गोंदिया – संपूर्ण महाराष्ट्रासह गोंदिया-भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. 6 एप्रिल पर्यंत संपूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे विधानसभा क्षेत्र कव्हर करण्याचा भाजपचा मानस आहे. या गौरव यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.


मुंबई आणि आरसीबीमध्ये लढत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता बेंगलोरमध्ये सामना रंगणार आहे.