28th July In History: आज जागतिक हिपॅटायटिस दिन आहे. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर, आजच्या दिवशी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांचा शपथविधी झाला. आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांचे निधनही आजच्या दिवशी झाले.
जागतिक हिपॅटायटिस दिन World Hepatitis Day
आज जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या रोगाबद्दल जगभर जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. बारुक एस ब्लुमबर्ग यांच्या सन्मानार्थ जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो. 28 जुलै 1925 साली जन्मलेल्या या वैज्ञानिकाने हिपॅटायटिस बी चा शोध आणि त्यावरील औषधाचाही शोध लावला होता.
हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई या रोगाची लागण दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे होते. हिपॅटायटिस बी, सी आणि डी ची लागण संक्रमित रक्त आणि संसर्गातून होते. त्याचसोबत आईकडून मुलाला या रोगाचे संक्रमण होऊ शकते, तसेच असुरक्षित शारीरिक संबंध, असुरक्षित सुयांच्या वापरामुळेही या रोगाचे संक्रमण होऊ शकते. ज्या लोकांना हिपॅटायटिस बी ची लागण झाली आहे त्या लोकांना हिपॅटायटिस डी चीही लागण होते.
1979: चौधरी चरणसिंग यांची भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथविधी
28 जुलै 1979 रोजी चरण सिंग यांनी भारताचे पाचवे पंतप्रधानपद म्हणून शपथ घेतली. इंदिरा काँग्रेस व बाहेरील पाठिंब्याने (सोशलिस्ट) गटाचे उप-पंतप्रधानपदी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पाठिंबा दिला. लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याआधीच इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि केवळ 23 दिवसांनी संसदेला सामोरे जाण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी 20 ऑगस्ट 1979 रोजी राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. लोकसभा विलीन झाली आणि चरण सिंग जानेवारी 1980 पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहिले.
चरण सिंह हे मूळचे काँग्रेस पक्षाचे नेते होते. मात्र, पक्षातंर्गत मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडला आणि भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला. आणीबाणी नंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
1975: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन
चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा आज स्मृतीदिन. त्यांनी दिग्दर्शित केलेले मी तुळस तुझ्या अंगणी (1955), रंगल्या रात्री अश्या (1962), एकटी (1968), मुंबईचा जावई (1970), घरकुल (1971) आणि जावई विकत घेणे आहे (1972) हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटांसांठी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.
मास्टर विनायक आणि राजा परांजपे यांचे साहाय्यक म्हणून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. 1960 च्या सुमारास मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कथानकांवर आधारित अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले.
2016: साहित्यिक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांचे निधन
महाश्वेता देवी या बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2002 मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना 1996 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमधून इंग्रजी विषयातील पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्यामधून विश्व भरती विद्यापीठातून एम. ए. केले. पुढे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून बिजायग्रह जोतिराय काॅलेजमध्ये त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी समाजसेवा आणि आदिवासींच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन केले. पुढे त्यांनी पत्रकारिता केली. महाश्वेता देवी यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून भारतीय समाजात परंपरेने चालणाऱ्या शोषक व्यवस्थेवर प्रहार केला.
अरण्येर अधिकार, नैऋते मेघ, अग्निगर्भ, गणेश महिमा, रुदाली, हाजार चुराशीर मा, आय.पी.सी. 375, डस्ट ऑन द रोड, प्रस्थानपर्ब, बन्दोबस्ती आदी कादंबरी-लघुकथा, साहित्य गाजले.
त्यांच्या कथेवर संगरूश (1968), रुदाली (1993), हजार चौरासी की मां (1998) माती माय (2008) आदी चित्रपटांची निर्मिती झाली. साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याशिवाय, ज्ञानपीठ पुरस्कार, सार्क साहित्य पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
महाश्वेता देवी यांनी आदिवासी, दलित, वंचित घटकांच्या बाजूने आपला आवाज उठवला. डाव्या विचारांचा पगडा असला तरी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन डाव्या सरकारने सुरू केलेल्या औद्योगिकीकरणाच्या धोरणाला विरोध केला. सिंगूर, नंदिग्राममधील प्रस्तावित कारखान्यांसाठीच्या भूसंपादनाविरोधात त्यांनी आवाज उठवला. या आंदोलनात त्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. पुढे 2011 मधील निवडणुकीत डाव्या आघाडीची 34 वर्षाची सत्ता संपुष्टात आली.
इतर महत्त्वाच्या घटना
1821: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
1936: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.
1943: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
1954: व्हेनेझुएलाचे समाजवादी नेते आणि राष्ट्रपती ह्युगो चावेझ यांचा जन्म.
1981: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन.
1984: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
1988: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग 8 वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.
2001: इयान थॉर्प - जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारे पहिले जलतरणपटू ठरले.