27 December Headlines: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विधानपरिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. तसंच केंद्रशासित प्रदेशासाठी महाराष्ट्रानं ठराव मंजूर केला पाहिजे, असंही उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे म्हणाले. आज सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन ठराव मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांनी सांगितलं आहे.

  


आज अब्दुल सत्तार त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देणार 


कथित गायरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अडचणीत आले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज विधानसभेत उत्तर देणार आहेत. 


देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी आज मॉक ड्रील


आज  देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्यात आली आहे. मॉक ड्रीलचा उद्देश कोविड वाढला तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता यावं हाच आहे.   


वंचित बहुजन आघाडीचा आज नागपुरात इशारा मोर्चा


नागपूर- वंचित बहुजन आघाडीचा आज नागपुरात इशारा मोर्चा असून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. हा मोर्चा यशवंत स्टेडियम वरून विधानभवनाच्या दिशेने निघेल. महापुरुषांचा अपमान, गायरान जमिनीचा प्रश्न, शेती उत्पन्नाला हमीभाव आदी मागण्यांसाठी हा मोर्चा निघेल, दुपारी 12 वाजता.


आज भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार


नागपूर- विधिमंडळचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी 8 वाजता भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार आहेत. त्याठिकाणी आमदार आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. या वेळी संघाचे नेते भाजपच्या (BJP) आमदारांना मार्गदर्शन करत संघाच्या कार्याची माहिती देणार (सरसंचालक मोहन भागवत आणि इतर वरिष्ठ संघ नेते आज नागपुरात नाहीत). शिंदे गटाचे आमदार या उपक्रमात सहभागी होणार नाहीत.


तुनिषा शर्मावर (Tunisha Sharma) आज अंत्यसंस्कार करण्यात येणार 


टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचे (Tunisha Sharma) पार्थिव आज मीरा रोडवर तिच्या निवासस्थानी नेण्यात येईल. आज दुपारनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


आज बडनेरामध्ये कालीचरण महाराजांची सभा


अमरावती- आज बडनेरामध्ये कालीचरण महाराजांची सभा होणार आहे. अमरावतीच्या बडनेरा येथे हिंदूसूर्य प्रतिष्ठान द्वारा आयोजित शौर्य दिनानिमित्त 'हिंदू हुंकार सभा' सायंकाळी 6  वाजता आयोजित केली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना, भारत रक्षा मंच आणि हिंदू जनजागृती समितीने केले आहे. 


Pune : पुण्यात राज ठाकरे तीन कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.


अनिल देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार


अनिल देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार. आज सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी न झाल्यास देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार. सुट्टीकालीन कोर्टात दाद मागण्याकरता सीबीआयनं हायकोर्टात धाव घेत स्थगितीची मुदत वाढवून घेतली होती.


सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब शिंदे दिपाली सय्यद यांच्याबाबत गौप्यस्फोट करणार


अहमदनगर- सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब शिंदे हे दिपाली सय्यद यांच्याबाबत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, दिपाली सय्यद यांचं दुबई आणि पाकिस्तान कनेक्शनबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. शिंदे हे दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत. दोन आठवड्यापूर्वीच त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. सकाळी 11 वाजता.