अमरावती : पैसे किंवा सोन्याचे दागिने इत्यादी गोष्टींच्या चोरीच्या घटना आपण ऐकल्या असतील, मात्र कुणाचं घरंच चोरीला गेलंय, असं कधी ऐकीवात आहे का? पण असं प्रत्यक्षात घडले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे चक्क 25 पक्क्या घरांची ‘विद्युत कॉलनी’च चोरीला गेली आहे. चांदुर बाजार पोलिस ठाण्यात घरांच्या चोरीची तक्रार करण्यात आली आहे.
चांदुर बाजार येथे नियोजित विद्युत कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 1988 पासून शेत सर्व्हे क्र. 6/2 या आकर्षक लेआऊटमधील प्लॉटचे शासकीय हक्क 2012 पर्यंत अबाधित होते. शासकीय खरेदी आणि आदेशप्रमाणे ही कॉलनी वसली असून, या विद्युत कॉलनीमध्ये 25 कुटुंबांनी पक्की घरं बांधली. त्यांना मालमतेचा फेरफार सुद्धा देण्यात आलं होत. मात्र 2012 नंतर कागदोपत्री ही कॉलनी या ठिकाणी नसल्याचे दिसते.
या विद्युत कॉलनीमध्ये 2012 पर्यंत प्लॉट धारकांना शेत सर्व्हे क्र. 6/2 चा 7/12 पण देण्यात आलं होतं. मात्र आता काहींनी आपल्या घरावर कर्ज तर काहींनी विक्रीसाठी घर काढले असता, त्यासाठी शेत सर्व्हे क्र. 6/2 चा 7/12 मागण्यासाठी गेले असता या ठिकाणी आपापले घरे नसल्याचे तलाठी यांनी सांगितले. शिवाय शेत सर्व्हे क्र. 6/2 चे रेकॉर्ड आपल्याकडे नसल्याचे आणि टोलवाटोलवीचे उत्तर रहिवाशांना देण्यात आले. पूर्वीच्या तलाठींनी हा कारभार केल्याचे, शिवाय यात खोडतोड व पुर्नलेखन झाल्याचे स्पष्ट होते.
विद्युत कॉलनीतील या 25 कुटुंबांना सध्या आपल्या घरावर कोणताही व्यवहार करता येत नाही. कारण यांच्याकडे घराचा शेत सर्वे क्र. 6/2 चा 7/12 च नाही. त्यामुळे ही घरं विकणे, कर्ज काढणे किंवा गहाण ठेवणे कठीण झाले आहे.
अखेर तहसील कार्यालयाच्या चकरा मारुन या कॉलनीतील 25 कुटुंब कंटाळले असून, त्यांनी चांदुरच्या पोलिसात विद्युत कॉलनी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांशी याबाबत संपर्क केला असता हा महसूल विभागाचा घोळ असल्याचं सांगितलं व बोलण्यास नकार दिला, तसेच तहसीलदार यांनी याप्रकरणी आम्ही चौकशी केली आणि त्याचा अहवाल आम्ही एचडीपीओ यांना पाठवले आहे. लवकरच हे प्रकरण मार्गी लागेल असं त्या म्हणाल्या.
2012 च्या तलाठी रेकॉर्डनुसार ही कॉलनी आता शेत सर्व्हे क्र. 6/2 नसून शेत सर्व्हे क्र. 6/3 वर असल्याचे संभ्रम तयार करण्यात आला. मात्र या कॅलनीत 25 खरेदी धारकांकडे शेत सर्व्हे क्र. 6/2 ची खरेदी प्रत आहे आणि इतर कागदपत्रे आहेत. गेल्या 6 वर्षांपासून या कॉलनीतील रहीवाशांचे प्लॉट संबधीचे सर्व काम रखडले असून महसूल खात्याच्या संकेत स्थळावरुन देखील ही कॉलनी गायब आहेत.
पैसे किंवा सोने नव्हे, चक्क 25 घरं चोरीला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2018 06:16 PM (IST)
अखेर तहसील कार्यालयाच्या चकरा मारुन या कॉलनीतील 25 कुटुंब कंटाळले असून, त्यांनी चांदुरच्या पोलिसात विद्युत कॉलनी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -