परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण काळात वैद्यकीय सेवा बजावणार्‍या 24 वर्षीय तरुण कोरोना योद्धा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुण डॉक्टरांच्या मृत्यूने परभणीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


परभणी शहरातील विकास नगर येथील 24 वर्षीय डॉक्टर संघरत्न खिल्लारे हे जिल्हा रुग्णालयात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर होते. त्यांची ड्युटी ही कोरोना वॉर्डात असल्याने मागची काही महिने त्यांनी इथे सेवा दिली. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर  जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अत्यंत तरुण प्रशिक्षणार्थी कोरोना योद्धा डॉक्टरचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. दुसर्‍या टप्प्यात परभणी जिल्ह्यात ही केंद्रे सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिंग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत.


आरोग्य सेविका,बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये व त्याअंतर्गत येणार्‍या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा शासनाचा मानस आहे. माता बालसंगोपन आरोग्य सेवांमध्ये वाढ करून असंसर्गजन्य आजार तपासणीसाठी आरोग्य सेवा आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षित समुदाय आरोग्य अधिकारी हे निकास परीक्षा उत्तीर्ण होऊन आरोग्य उपकेंद्रांवर कार्यरत होतात. अशाच पद्धतीने संघरत्न खिल्लारे हे प्रशिक्षण घेत असताना कोविड वॉर्डात सेवा बजावत होते. त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याने आजाराशी लढा देताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.