बेळगाव : टुमकुरच्या फूल व्यापाऱ्याच्या डोळ्यात तिखट टाकून त्याच्याकडील 24 लाख रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल लुटणाऱ्या चौघांना शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख रुपये रोख आणि गुन्ह्याच्यावेळी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आणि प्रभारी शहर पोलीस आयुक्त डॉ. आर. रामचंद्रराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,अमरनाथ रेड्डी आदी उपस्थित होते.


4 डिसेंबर रोजी टुमकुरचे फुलाचे व्यापारी नारायणाप्पा हे टुमकुरला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सागर हॉटेल जवळ बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या आणि सहकाऱ्याच्या डोळ्यात तिखट पूड टाकून त्यांच्याकडील 24 लाख रुपयांची रक्कम आणि दोन मोबाईल लुटले होते.

या प्रकरणाची माळमारुती पोलीस स्थानकात नोंद झाली होती. शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे खास पथक याचा तपास करत होते. खास पथकाने तपास करुन लूट करणाऱ्या चौघांना अटक केली.

असफरअली नजीरमहंमद मकानदार, उमेश बस्तवाडे, यल्लेश तानुगोळ आणि शशिकांत मिसाळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. आणखी एक आरोपी निस्सार शब्बीर मुल्ला हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.