अहमदनगर : राज्यातील 22 हजार ग्रामवसेवक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत असहकार व कामबंद आंदोलन सुरु करत असल्याची माहिती राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली. ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे आजपासून (7 नोव्हेंबर) राज्यभरातील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राज्य ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून हे बेमुदत आंदोलन सुरु राहणार आहे. सरकारसोबत सातत्याने चर्चा करुनही अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांनी संपाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे.