21th June Headlines: आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून ते संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिन साजरा करणार आहेत. 


आज आंतरराष्ट्रीय योगदिन


पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.25 ते संध्याकाळी 6.30 वाजता संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध देशातील राजदूत आणि नेते सहभागी होणार आहेत. साधारण 3000 राजदूत सहभागी होणार आहेत.       


मुंबई – विधान भवनात योगा दिवस साजरा होणार आहे. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित रहातील.


नागपूर – जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगर पालिकेने यंशवंत स्टेडियम येथे योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत.


संभाजीनगर – भाजप नेत्या पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथे अनाथ बालकांसोबत जागतिक योग दिवस साजरा करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभाग आणि बालोन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा योगा दिवस विभागीय क्रीडा संकुल येथे साजरा केला जाणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिका दौरा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदींची CEOs and Thought Leaders या  कार्यक्रमात मुलाखत होणार आहे.
 
हिंदुत्ववादी संघटनांकडून नांदेड बंदची हाक


किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गो तस्करानी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी झालेत. या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांकडून आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे.


सेना भवनावर मुंबईतील विभागांची बैठक 
 
मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता सेना भवनावर मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक होणार आहे. माजी नगरसेवकांची बैठक काल पार पडली यामध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सूचना केल्या आहेत. आगामी मुंबई महानगर पालिका आणि सुरू असलेलं आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्वाच्या आहेत.
 
राष्ट्रवादीचा मुंबईत कार्यक्रम 


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज दुपारी 2 वाजता षण्मुखानंद सभागृहात पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. तर नव्याने नियुक्त झालेले कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल पटेल भाषण करतील. शरद पवार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काय दिशा देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 
 
काँग्रेसची लोकसभेची आढावा बैठक


मुंबई – आगामी लोकसभेची तयारी म्हणून काँग्रेसने मुंबई वगळता राज्यातील जिल्हा निहाय लोकसभेचा आढावा घेतलेला आहे. त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीत त्यावर चर्चा झालेली आहे. आजपासून नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत लोकसभेचा आढावा सुरू होणार आहे. आज दक्षिण मुंबई लोकसभा आढावा घेतला जाणार आहे. मात्र या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या विद्यमान खासदार हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. त्याचसोबत माजी खासदार मिलिंद देवरा सुद्धा या जागेवरती आग्रही राहणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेस नेते कशी चाचणी करणार हे पाहणं महत्वाचं राहील.
 
आषाढी वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडणार


पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून सकाळी 9 वाजता 1500 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. आषाढी यात्रेसाठी 3 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी कमालीची घटल्याने गाळ मोरितून पाणी सोडावे लागणार आहे. 
 
योग दिन इतर इव्हेंट



  • मुंबई – गेट वे ऑफ इंडीयावर सकाळी 6 वाजता पतंजली योगपीठाकडून योग प्रात्याक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

  • जबलपूर – उपराष्ट्रपती जगदीप धनकड सहभागी होणार आहेत, सकाळी 6 वाजता.

  • गुरूग्राम – भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, सकाळी 6 वाजता.

  • कोची – आयएनएस विक्रांत वर हणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत.

  • दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री इंडिया गेटवर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. 

  • दिल्ली – संसद भवनात आयोजित कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सहभागी होणार आहेत, सकाळी 6 वाजता.

  • पुणे – आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप, आर्ट ऑफ लिविंग आणि महा एन जी ओ फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने 5000 योग साधक योग साधना करणार आहेत, सकाळी 7 वाजता, स प महाविद्यालय मैदान. यावेळी चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत. 

  • मुंबई – वांद्रे येथे आयोजित योगदिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार यांच्यासह विविध राजकीय नेते सहभागी होणार आहेत, सकाळी 7 वाजता. 



आजच्या सुनावणी



  • कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी शाहरूख खानला आरोपी करण्यासाठीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणीची शक्यता. सीबीआयनं लाचखोरीच्या प्रकरणात समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल केलाय तर त्यात लाच देणाऱ्या शाहरूखलाही आरोपी करण्याची याचिकेत मागणी.

  • शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांची बदनामी केल्याबद्दल दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी साईनाथ दुर्गे यांची हायकोर्टात याचिका. या याचिकेवर आज सुनावणी.

  • पत्रकार जे डे हत्याप्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्व आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिलंय. तसेच सीबीआयनंही याप्रकरणी विरोध करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार.