Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले आहेत.रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान या विद्यार्थ्यांना घेऊन नुकतचं मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. 






युक्रेनहून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केलं होतं. एअर इंडियाचं हे विमान आज रात्री साडेआठ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे. विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत केले. 






युक्रेनमधील बिकट परिस्थितीतून हे विद्यार्थीय मायदेशी परतल्यानंतर मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचं स्वागत केलं असून त्यांनी सोशल मीडियावरही या विद्यार्थ्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 






युक्रेनध्ये अजूनही भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.







एअर इंडियाचं हे विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन भारताकडे रवाना झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली होती. "युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत आम्ही प्रगती करत आहोत. आमची टीम 24 तास मैदानावर काम करत आहे. मी या सर्व गोष्टींवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहे, अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली होती. 


महत्वाच्या बातम्या