मेहबूब मुजावर म्हणाले की, "मालेगाव स्फोटाचे दोन आरोपी संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांना फरार असल्याचं सांगितलं जात होतं. खरंतर त्या दोघांची आठ वर्षापूर्वीच हत्या केली होती. इतकंच नाही तर एटीएसच्या कोठडीत हत्या केली. त्यानंतर, दोघांना मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मृत असल्याचा सांगत त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली."
2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. मेहबूब मुजावर हे मालेगाव स्फोटाच्या चौकशी पथकातील एक सदस्य होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना उत्पन्नाहून अधिक संपत्ती आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं.
सोलापूर कोर्टात सुरु असलेलं हे प्रकरण संपवण्यासाठी मेहबूब मुजावर यांनी याचिका दाखल केली आहे. याचवेळी प्रतिज्ञापत्र सादर करुन मेहबूब मुजावर यांनी मालेगा स्फोटाचे आरोपी संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. मी कोर्टात आणखी खुलासे करेन, असंही मेहबूब मुजावर यांनी म्हटलं आहे.
2006 च्या मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित यांना ज्या दिवशी अटक केली, त्याच दिवशी संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांनाही अटक केली होती. पण एटीएसने संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांना फरार आरोपी घोषित केलं.
दरम्यान, मेहबूब मुजावर यांचे आरोप अतिशय गंभीर असून सरकार यावर गांभीर्याने विचार करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एनआयए मुजावर यांच्या आरोपांची चौकशी करत आहे.