रायगड : पावसाळी पर्यटन म्हणून पर्यटक धबधब्यांना पसंती देतात. मात्र, अनेकदा हे पर्यटन जीवावर बेततं. रायगडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. माणगावमधील देवकुंड येथील धबधब्याखाली दोन तरुण बुडाले. रविवारी संध्याकाळनंतर शोधकार्य थांबविण्यात आले असून आज सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात येणार आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्याच्या परिसरात पर्यटकांनी वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळेस पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या दोन ग्रुपमधील दोन तरुण हे देवकुंड येथील धबधब्याच्या पाण्यात बुडल्याची घटना घडल्याची माहिती माणगाव पोलीसांना देण्यात आली.
माणगाव पोलिसांनी तातडीने रिव्हर राफ्टर्सना पाचारण करून घटनास्थळाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राफ्टर्सच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आले होते.
यामध्ये पुण्यातील भोसरी येथील 23 वर्षीय अखिल चौधरी आणि पुण्यातील 25 वर्षीय विद्यार्थी नितीन पाठक हे पाण्यात बुडाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुंबई येथील 55 विद्यार्थी अडकल्याने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.