चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा या गावाशेजारी मातीचा ढिगारा कोसळून 2 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु असताना ही घटना घडली.

मूल तालुक्यातील चिचाळा येथे आसोलामेंढा कॅनलपासून पाणी आणण्यासाठी 10 ते 15 फूट खड्डा खोदून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु होते. पुण्यातील एका कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. या कामासाठी खड्ड्यातील माती बाजूलाच काढून ठेवण्यात आली होती.

चुकीच्या पद्धतीने हे खड्डे खोदण्यात आल्यामुळे ही माती कोसळून हा अपघात झाला. या घटनेत हरिदास दुधबळे (42) आणि रवी उईके (31) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गजानन मेश्राम (40) हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेनंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर कंपनीने मृतांच्या कुटुंबियांना 15 लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली.