सोलापूर : सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री 11 च्या सुमारास रुग्णालयात असलेल्या दोन टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाला. स्फोटात झालेल्या घटनेदरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. मृतामध्ये एक रुग्ण आणि एका रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूस ॲक्सिजन टॅंकचा स्फोटच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत. रुग्णाची परिस्थिती आधीच खालावलेली असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. 


यातील एक मृत सुनील लेंगारे हे पोस्ट कोव्हिड उपचारासाठी सोलापूरच्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती आधीपासूनच खालावलेली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे कालच या घटनेशी याचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देखील रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. 

 

तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या आईला डबा देण्यासाठी आलेले हनुमंत शिरसागर यांचा देखील या घटनेदरम्यान मृत्यू झाला. स्फोटाच्या वेळी हनुमंत शिरसागर हे आपल्या आईला डबा देऊन रुग्णालय परिसरामध्ये बसले होते. त्यावेळी ऑक्सिजन त्यांचा स्फोट झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना यास रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईक मदन क्षीरसागर यांनी केला. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान मृत हनूमंत शिरसागर यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे चेअरमन डॉ.  माणिक गुर्रम यांनी दिली.

टाकीचा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात टाकीतील केमिकलयुक्त पावडर पसरली.  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.  दरम्यान टाकीचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही. प्राथमिकदृष्टया केमिकल रिॲक्शनमुळे टाकीचा स्फोट झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी व्यक्त केली होती. 


रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये दोन मोठ्या टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी मागील काही दिवसांपासून बंद होती. तर दुसऱ्या टाकीतून रुग्णालयास ऑक्सीजन पुरवठा सुरु होता. बंद असलेल्या टाकीमध्ये अचानक ठिणगी येत असल्याचे काही जणांनी पाहिले. मात्र कोणालाही माहिती कळवण्याआधीच भीषण असा स्फोट झाला. प्लांटच्या बाजूला रुग्णांच्या नातेवाईंकासाठी प्रतिक्षालय आहे. या ठिकाणी असलेल्या अनेकांना याचा धक्का बसला. मागील बाजूस असलेल्या दरवाजाने या ठिकाणातील सर्व नागरिक बाहेर पळून आले. मात्र या स्फोटामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी टाकीत असलेली केमिकलयुक्त पावडर सर्वत्र पसरली होती. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात साफसफाईचे काम सुरुच होते. 


या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यात आली. पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह परिसरातील नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. स्फोटामुळे रुग्णांचे नातेवाईक घाबरलेल्या परिस्थितीत होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन सर्व रुग्णांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली. 
 
स्फोट झालेल्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या एका वॉर्डात केमिकलयुक्त पावडर मोठ्या प्रमाणात पसरल्याने तेथील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर देखील उपचार केले जातात. दरम्यान हा प्रकार नेमका कशामुळे घडला? सुरक्षेच्या नियमांचे पालन होत होते का याची चौकशी करुन जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करु असा इशारा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला.