रायगडमध्ये 19 वर्षीय वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2018 11:23 AM (IST)
19 वर्षीय वेटलिफ्टर वैभवी पाटेकरने नैराश्येतून आत्महत्या केली. माणगाव तालुक्यातील गोरेगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली.
रायगड: बिकट परिस्थितीवर मात करत वेटलिफ्टिंगमध्ये नावलौकिक करणाऱ्या 19 वर्षीय वेटलिफ्टर वैभवी पाटेकरने नैराश्येतून आत्महत्या केली. माणगाव तालुक्यातील गोरेगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली. वैभवी पाटेकरने गेल्या काही वर्षात वेटलिफ्टिंगमध्ये करिअर सुरु केले होते. वैभवीच्या आईनेही वेटलिफ्टिंगची स्पर्धा गाजवली होती. आर्थिक परिस्थितीवर मात करत वैभवीच्या आईने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आईपासून प्रेरित झालेल्या वैभवीने आईच्या पावलावर पाऊल टाकत, वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेत सुवर्णपदक मिळविले होते. आर्थिक गाढा चालविण्यासाठी वैभवी तिच्या आईला मदत होती. त्यासाठी त्या दोघी सॅन्डविच स्टॉल चालवत होत्या. दरम्यान, बीएच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत वैभवी काही विषयात नापास झाली होती. परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे वैभवी गेल्या काही दिवसांपासून नाराज झाली होती. याच नैराश्यातून वैभवीने 28 ऑगस्टच्या रात्री घराजवळ असलेल्या तलावात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.