काय आहे प्रकरण?
औरंगाबाद येथील घनसावंगी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी 7 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. घाबरलेल्या तरुणीने अत्याचाराबाबत कोणालाही माहिती दिली नव्हती.या तरुणीचे भाऊ मुंबईतील चेंबूरमध्ये राहतात. दोन महिन्यांपूर्वी ही तरुणी भावाच्या घरी आली होती. तेव्हापासून ती तेथेच राहत होती. 7 जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असं घरी सांगून ती घराबाहेर पडली. मात्र नंतर तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केले. संध्याकाळी घरी परतली तेव्हा ती आजारी पडली आणि तिचे पाय कापत होते. पॅरॉलिसिस झाला असावा, असं सांगून भावाने गावाकडे असलेल्या वडिलांना फोन करुन बोलावून घेतलं. नंतर गावी उपचार करु, असं म्हणत तिला 17 जुलै रोजी जालन्याला गेले.
तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला 25 जुलै रोजी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी उपचारांची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला असावा, असा अंदाज आला. त्यांनी ही बाब तिच्या पालकांना सांगितली. आई-वडिलांनी या मुलीला याबाबत विश्वासात घेऊन विचारले असता तिने चार जणांनी चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचं सांगितलं. यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. परंतु ही घटना मुंबईच्या चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरातील असल्याने हा गुन्हा चुनाभट्टी पोलिस स्टेशनमध्ये वर्ग केला आहे.
चुनाभट्टी पोलिसांवर आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप
या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. तरुणीचा मृत्यू झाला, आरोपींची नावं देऊनही त्यांना अटक केली जात नाही, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या आरोपांवर चुनाभट्टी पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणात अद्याप ठोस पुरावे मिळालेली नाही. मात्र लवकरच आरोपींना पकडू. आम्ही तपास करत आहोत, असं स्पष्टीकरण चुनाभट्टी पोलिसांनी दिलं आहे. तर दुसरीकडे चुनाभट्टी पोलिस ठाण्याबाहेर मात्र विविध पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
आरोपी सुटणार नाहीत, फाशीचीच शिक्षा होईल : केसरकर
दरम्यान, आरोपी फरार जरी असले तरी कुठलाही आरोपी सुटू शकत नाहीत. पोलिस दल आरोपींचा सक्षमपणे शोध घेईल. अशा क्रूर घटनेने जनतेच्या मनात जनप्रक्षोभ निर्माण होतो. आरोपींना पकडण्यासोबत बलात्काऱ्यांना शिक्षा होणं महत्वाचं आहे. या प्रकरणातील आरोपी सुटणार नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा होईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं. पोलिसांची वेगवेगळी पथकं नेमून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीरामपूर इथल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
राष्ट्रवादीचा मुंबईत भव्य मोर्चा
या सामूहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज (30 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार आहे. तरुणीची महिनाभर मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज संपली. या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या घटनेच्या निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
आरोपींच्या त्वरित अटकेची मागणी
या प्रकरणातील दोषींचा तपास न लावल्याबद्दल स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचा तीव्र निषेध केला. निषेधाचे पत्र जिल्हा प्रशासनास देण्यात आलं आहे. याप्रकरणात 5 सप्टेंबरपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास शिक्षक दिनापासून आरंभी धरणे आणि नंतर आमरण उपोषण तसंच इतर मार्गाने सत्याग्रह केला जाईल, असंही महासंघाने नमूद केलं आहे.