नागपूर : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मैत्रीचा दिवस म्हणजेच 'फ्रेंडशिप डे' तीन दिवसांवर आलेला असताना मैत्रिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन दोन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करण्यापूर्वी या दोघांनी आपल्या मैत्रिणीला दारु पाजली आणि त्यानंतर नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला.

नागपूरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणीच्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित तरुणी 18 वर्षांची असून निखिल सोमकुवर या तरुणासोबत तिची मैत्री होती. आरोपी निखिल पीडित तरुणीच्या मामाचाही मित्र होता. सुरुवातीला दोघांमध्ये असलेली सामान्य ओळख नंतर घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली होती. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी तिच्या घरी एकटी असताना आरोपी निखिल सोमकुवर तिला घरी भेटायला गेला होता. त्यावेळी निखिलने पहिल्यांदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आठ दिवसांपूर्वी निखिलने त्याच्या वतन नावाच्या आणखी एका मित्रासोबत पुन्हा पीडित तरुणीचे घर गाठले. निखिल आणि वतन या दोघांनी पीडितेला मद्यपान करायला लावले आणि ती नशेत असताना आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित तरुणीला प्रचंड नैराश्याने ग्रासले होते. तिच्या वर्तनात झालेले बदल आणि तसेच तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तरुणीच्या आईला शंका आली. पीडितेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यासोबत घडलेले प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपी निखिल सोमकुवर आणि वतन गोमकाळे या दोन आरोपींच्या विरोधाचे सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे