कोल्हापूर : टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून कोल्हापुरात एका 17 वर्षीय युवतीने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने पाच संशयितांची नावं लिहिल्याचीही माहिती आहे.

 
कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीने काल रात्री उशिरा आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.युवती तिच्या आजी आणि धाकट्या बहिणीसह राहत होती. जवळच्या एका बंगल्यात काम करत असताना अनेक वेळा परिसरातील काही टवाळखोर तिची छेड काढत असत. याच जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

 

 

सुसाईड नोटमध्ये तिने पाच संशयितांची नावं लिहिली होती. हे समजल्यानंतर आजूबाजूच्या व्यक्तींनी संशयितांच्या घरावर दगडफेक केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमावाला पांगवण्यात आलं.

 
यापूर्वीही रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या काही युवतींच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान पोलिस आता कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.